श्रीरामपूरात ६ ते ८ मार्च दरम्यान महिला शक्ती चित्रप्रदर्शनाचे आयोजन

श्रीरामपुर, दि. ५ – श्रीरामपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ६ ते ८ मार्च या कालावधीत महिला शक्ती बहूमाध्यम चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन नगरपरिषद आगाशे सभागृह, आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालय, मेन रोड येथे सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत सुरू राहणार आहे.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत असलेले केंद्रीय संचार ब्युरो- अहिल्यानगर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी – श्रीरामपूर , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती श्रीरामपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीरामपूरमध्ये प्रथमच असे भव्य आणि दर्जेदार प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमांतर्गत तिरंगा थाळी, पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, महिलांना यशस्वीरित्या पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महिला विषयक प्रदर्शनात पद्म पुरस्कार विजेत्या भारतीय महिलांची माहिती, भारतातील महिला स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलातील महिलांची भूमिका, महिला शक्ती नव्या भारताची दिशादर्शक, ग्रामीण भागातील यशस्वी महिला उद्योजक, भारतातील महिला विज्ञानशास्त्रज्ञ यांसारख्या विषयांवरील माहिती चित्ररूपात आणि मल्टीमीडिया स्वरूपात मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनाचा विद्यार्थी, महिला मंडळे, विविध सामाजिक संस्था व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय प्रचार अधिकारी शिल्पा पोफळे, फणि कुमार, प्रांताधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष किरण सावंत पाटील, तहसीलदार तथा उपाध्यक्ष रेडक्रॉस सोसायटी मिलिंद कुमार वाघ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभाताई शिंदे आणि रेडक्रॉस सोसायटीचे सचिव सुनील साळवे यांनी केले आहे.