पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मुळे महिलांना सन्मान – डॉ.अशोक भोजने

नगर – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी राजसत्तेत असतांना देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार व बारव संवर्धन उपक्रमाला बळ दिले. त्या काळी असलेल्या महिलांवर अन्याय करणार्या कुप्रथांना मुठमाती देत त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे महिलांना सन्मानाची वगणूक मिळू लागली. त्यांनी घेतलेला महिला सक्षमीकरणाचा वसा आजच्या महिलांना सन्मान मिळून देत आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रबोधिनीचे सचिव डॉ.अशोक भोजने यांनी केले.
ढवण वस्ती येथील पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर विचार मंच व स्व.दिगंबर ढवण मित्र मंडळाच्यावतीने पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर जयंती प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष निशांत दातीर, कार्यकारिणी सदस्य अर्जुन कजबे, अनिल ढवण, ज्ञानेश्वर तागड, कैलास कजबे, रोहन ढवण, ऋषी ढवण, गणेश कजबे, अक्षय लांभाते, पंकज बाहेती, बाळू कजबे आदिंसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व स्व.दिगंबर ढवण मित्र मंडळाचे सहकारी उपस्थित होते.
डॉ.भोजने म्हणाले की, सध्या देशभर पाण्याचे महत्व समजण्यासाठी विविध उपक्रम व अभियान राबवित आहेत. मात्र होळकरांच्या राज्य कार्यकाळातील अनेक पाणी योजना आजही सुरु आहेत. त्या काळातील बारव संवर्धन उपक्रम व त्याचे बांधकामे आजही उत्कृष्ट विशारदाचे उदाहरण असल्याचे सांगतात. अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासक होत्या, त्याचबरोबर त्या दानशूरही होत्या. त्यांच्या तिजोरीतून आजही अनेक मंदिरे व देवालयांना मदत मिळते; हे निश्चितच भविष्याचे ध्येय ठेवून निर्णय घेतल्याचे दिसून येते. या अलौलिक प्रतिभासंपन्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मगांव जामखेड तालुक्यातील चौंडी असल्याने आम्हाला हे शक्तीपीठ नगरमध्ये असल्याचा अभिमान वाटतो. नगर शहरातील भिस्तबाग चौकाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाले असून, 28 गुंठ्यांच्या ओपन स्पेसवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. या ओपन स्पेसवर अजूनही समाजाभिमुख काम प्रलंबित असून, लवकरच याबाबतही प्रबोधिनीच्यावतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ.भोजने यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल ढवण यांनी केले. सूत्रसंचालन रोहन ढवण यांनी केले तर आभार ऋषी ढवण यांनी मानल.