
शहाराम आगळे
शेवगाव,तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन मागे घेताना काळे कृषी कायदे रद्द केले. परंतु शेतमालाला एमएसपी कायद्यासह इतर दिलेली आश्वासन केंद्राने न पाळल्याने शेवगाव तालुका अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करून देशव्यापी विश्वासघात दिवस पाळला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव . कॉ. सुभाष लांडे, भगवान गायकवाड,संजय नांगरे, बापूराव राशीनकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
यावेळी. कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे तरीही शेतकऱ्यांना तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुमारे वर्षभर आंदोलन करावे लागले. या आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले. तीन काळे कायदे रद्द करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमालाला एमएसपी कायदा लागू करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या.
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन वापसीच्या वेळी तीन काळे कायदे रद्द करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमालाला एमएसपी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, ७०० शहिद शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारसांना अर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले होते.
मात्र केंद्राने अद्यापही कोणतेही आश्वासन पाळले नाही. केंद्राची ही भूमिका निषेधार्ह व विश्वासघातकी आहे.यावेळी नायब तहसीलदार मयूर बेरड यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात बाजार समितीचे संचालक अशोक नजन, कारभारी वीर, दत्ता आरे, नवनाथ खंडागळे, वैभव शिंदे, रत्नाकर मगर , राजू शेख, आत्माराम देव्हडे भाऊ बैरागी आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.