अहमदनगर

कोतुळ येथे किसान सभेचे धरणे आंदोलनास सुरुवात!


कोतुळ प्रतिनिधी
मुळा  धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करा. सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करा. निराधारांना 21000 च्या आतील उत्पन्न असल्याचे दाखले द्या,   आदिवासी व  शेतकऱ्यांचे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न तातडीने सोडवा यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने कोतूळ येथील मुख्य चौकात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.    
पिंपळगाव खांड धरणामध्ये पठार भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे फुटबॉल टाकण्यावरून परिसरात शेतकऱ्यांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. पठार भागाला प्यायला पाणी दिल्यास शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही या भीतीपोटी शेतकरी अस्वस्थ आहेत. पाणी  प्रश्नाबाबत प्रस्थापित पुढारी व परिसरातील नेते संघर्षात उतरले आहेत मात्र ते सुचवत असलेले उपाय या प्रश्नाचे खरे उत्तर असू शकत नाही. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा तो प्रकार आहे. अकोले विधानसभा मतदार संघातील आदिवासी, बिगर आदिवासी सर्व गावांना व शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी मुळा खोऱ्यातील पाण्याचे पुनर्वाटप होण्याची आवश्यकता आहे. तरच हा प्रश्न मुळातून सुटणार आहे. या पार्श्वभूमीवर मुळा खोऱ्यातील पाण्याचे पुनर्वाटप करुन परिसरातील सर्व गावांना व शेतकऱ्यांना किमान तीन टी.एम.सी. पाणी राखीव पद्धतीने उपलब्ध करून द्या, परिसरातील उपलब्ध सर्व साइट्सवर बंधारे बांधा विविध जलसाठयांमध्ये साचलेला गाळ काढून सर्व जलसाठ्यांची साठवण क्षमता पुनर्प्रस्थापित करा, आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या हिरड्याची 250 रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी तातडीने सुरू करा, विधवा, परित्यक्ता, वृद्ध, निराधार, अपंग यांना 21 हजाराच्या आतील उत्पन्नाचे दाखले उपलब्ध करून देऊन विशेष अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्याना किमान 3000 रुपये मानधन द्या,  पिंपळगाव खांड येथील कातरमाळ वस्तीवर वीज व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्या, फोपसंडी येथील कोंबड किल्ला येथे रस्ता  व विज याबाबतचे प्रश्न तातडीने सोडवा,  परिसरातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी व गुणवत्तापूर्ण बियाणे, कीटकनाशके, खते द्या यासारख्या मागण्या आंदोलनांमध्ये घेण्यात आल्या आहेत. 
उद्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ येथे किसान सभेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चासाठी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले उपस्थित राहणार असून  आंदोलनाचे नेतृत्व सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, भीमा मुठे,  प्रकाश साबळे, साहेबराव घोडे, किसन मधे, देवराम डोके आदी कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button