अकोल्यात अवैध दारू थांबवण्यासाठी आता कठोर उपाययोजना

अकोले प्रतिनिधी
अवैध दारू थांबवणे हा प्राधान्यक्रम असून उपलब्ध कायदे, लोकसहभाग, नवीन कल्पना राबवून अकोले तालुक्यातील अवैध दारू पूर्णत: बंद केली जाईल. दारूविक्री करणाऱ्यांकडून एक लाखाचा बाँड घेतला जाईल व दारू विकल्यास तो जमा केला जाईल व दारू विक्री होत असलेल्या बेकायदा इमारती ग्रामपंचायतीकडून पाडल्या जातील व कार्यकर्त्यांवर आंदोलनाची वेळ येणार नाही असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक वाघचौरे यांनी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

अकोले तालुका दारूबंदी आंदोलनाने अवैध दारू विषयावर आंदोलने जाहीर केले होते. त्यासंदर्भात पोलीस,उत्पादनशुल्क विभाग व दारूबंदी कार्यकर्ते अशी एकत्रित सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी श्रीवास्तव,श्री चांदेकर,श्री सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक भोये व शेळके उपस्थित होते.
या बैठकीत दारूबंदी आंदोलनाचे समन्वयक हेरंब कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टच्या शाहूनगर येथील आंदोलनानंतर तालुक्यात बंद झालेली अवैध दारू पुन्हा गावागावात वाढली आहे.संगमनेर ठान गाव, घारगाव मार्गे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार दारू आणत आहेत. लायसनची दारू दुकाने दारू गावोगावी देत आहेत. इंदोरी फाटा येथील गुन्हेगाराने दारू वाहताना ३ व्यक्तींना गाडीने उडवले पण गुन्हासुध्दा दाखल झाला नाही. हे आरोपी तडीपार करावेत अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर संदीप दराडे, संतोष मुतडक, मच्छिंद्र देशमुख,प्रमोद मंडलिक,डॉ.मनोज मोरे, संगीता साळवे, प्रदीप हासे,अरुण शेळके,मोहिते यांनी गावागावांतील भीषण स्थिती मांडली. महिलांना होणारे त्रास, हिंसाचार सांगितला. गांजाचा वापर वाढला असून जुगारात गरिबांची लूट होते आहे असे मांडले.चास गावच्या सरपंच व सदस्य यांनी एकत्रित समस्या मांडल्या.
संतोष मुतडक यांनी राजुरच्या दारू विक्रीचे वास्तव मांडले. ॲड. वसंत मनकर यांनी अनेक कायदेशीर मुद्दे मांडून दिलेल्या मुदतीत अवैध दारू बंद झाली नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने आलेले अधिकारी श्रीवास्तव यांनी अधिकृत दारू दुकानातून होणारी दारू विक्री थांबवण्यासाठी त्या दुकानांवर कारवाई केली जाईल. संगमनेर येथील गुंजाळवाडी,अकोल्याचे डोंगरे यांचे दुकान व शेंडीची दुकाने यावर लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली. पोलिस पाटील व बीट अंमलदार यांना जबाबदार धरत त्यांना नोटिसा देण्याची मागणीही करण्यात आली.
या बैठकीला शांताराम गजे, सुनिल शेळके, जालिंदर बोडके,कैलास नवले , बाळासाहेब मालुंजकर उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक श्री भोये यांनी आभार मानले.
*मिटिंगनंतर dysp वाघचौरे यांनी पोलीस स्टाफ सह शाहूनगर येथे जिथून अवैध विक्री होते त्या घरांची झडती घेवून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. त्यावेळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.*