निघोज च्या मळगंगा यात्रेत बेकायदा वर्गणी वसूल केली पारनेर न्यायालयाचे चौकशीचे आदेश!

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
: पारनेर तालुक्यातील निघोज येथील लाखो भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या मळगंगा देवी यात्रेच्या नावाखाली बेकायदा वर्गणी वसुली केल्याच्या तक्रारीबाबत पारनेर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत .
निघोज येथील माता मळगंगा देवीची राज्यातील प्रसिद्ध यात्रा भरत असते येथे जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्र आहे . त्यामुळे राज्यभरातून या ठिकाणी भाविक व पर्यटक येत असतात . दरवर्षी येथे एप्रिल महिन्यात यात्रा भरते . यावेळी निघोज येथील बाळासाहेब गणाजी लामखडे हे मळगंगा यात्रा कमिटी या नावाने पावती पुस्तके छापून भाविक व पर्यटकांकडून वर्गणी जमा करतात. या वर्गणीचा हिशोब त्यांच्याकडे मागितला असता तो देण्यास नकार दिल्याची तक्रार येथील ग्रामस्थ
बबन कवाद यांनी केली होती.
सन २०१५ पासुन कवाद हे संबंधित देवस्थान ट्रस्ट व प्रशासानाकडे तक्रार करत होते परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी पारनेर न्यायालयात वकील गणेश कावरे यांच्यामार्फत खाजगी फिर्याद दिली आहे . निघोज येथील मळगंगा देवस्थान ट्रस्ट ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था असताना या संस्थेच्या नावाऐवजी मळगंगा यात्रा कमिटी या बोगस नावाने समिती स्थापन करून आरोपी बाळासाहेब गणाजी लामखडे यांनी भाविकांकडून रकमा वसूल करून त्यात अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .
ट्रस्टचे पुस्तक छापल्यास ते हिशोबाचे ऑडिट होते . म्हणून बाळासाहेब लामखडे व इतरांनी मिळून संगनमताने हा गैरव्यवहार करत असल्याचा संशय आल्याने बबन कवाद यांनी तक्रारीत म्हटले आहे .
या तक्रारीची पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोराडे – कपूर यांनी दखल घेतली असून पारनेर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.अँड गणेश कावरे यांनी न्यायालयात तक्रारदार यांची बाजू मांडली