अहमदनगर

संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी फोपावली!
महसूल आर. टी. ओ. प्रशासनाचे  दुर्लक्ष



चंद्रकांत शिंदे पाटील
संगमनेर दि १३

बेकायदा वाळूच्या गोरख धंद्याकडे दुर्लक्ष करावे, यासाठी वाळू माफियांकडून संबंधितांना लक्ष्मी दर्शन घडविले जात असल्याने संगमनेर तालुक्यातील जोवेॅ येथील वाळू तस्करी फोफावली आहे  येथील वाळू माफियां स्थानिक महसूलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न चुकता महिन्याच्या महिन्याला लक्ष्मीचे दर्शन घडवत असल्याने महसूलचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा  ग्रामस्थां चा आरोप आहे .

संगमनेर तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या जोर्वे आणि परिसरातून  प्रवरा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू माफियांकडून वाळूचा उपसा सुरू आहे. रात्रीच काय दिवसा ढवळ्या निर्ढावलेल्या या वाळू तस्करांनी अक्षरक्ष: प्रवरा माईचे लचके तोडलेले आहेत. त्यामुळे प्रवरापात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असुन स्थानिक जागरूक ग्रामस्थांचे व संबंधित महसूलच्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या वाळू माफियांचे मनोधैर्य वाढले आहे.

        वाळू वाहतूक करण्यासाठी वापरात येणाऱ्या वाहनासाठी एकदा भांडवल गुतंवले की दररोज बक्कळ पैसे मिळतात आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे भांडवलही महिना दोन महिन्यात वसूल होत असल्याने तसेच झटपट श्रीमंत होण्याच्या नादात जोर्वेच नव्हे तर संगमनेर तालुक्यातील प्रवरानदी काठावरील  गावातील अनेक तरुण या गोरख धंद्यात उतरले आहेत आणि बिंनदिकतपणे संबंधित लोकांना मॅनेज करून वाळू तस्करी करत आहेत.  महसूलच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि पाठबळाशिवाय हे शक्य नसल्याची चर्चा आता ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
त्यांना ना कुणाचा  धाक आणि ना कोणाचेही भय यामुळे प्रवरा नदी काठावरील जवळजवळ सर्वच गावात प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रवरा नदीतील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे प्रवरेची वाळू म्हणजे पांढरे सोने असल्याने या वाळूला दरही चांगला मिळत आहे. जोवेॅतून उचललेल्या एका  वाळूच्या ट्रॉलीला संगमनेरात सात ते साडेसात हजार रुपये मिळत   आहे. हीच वाळू पुढे घुलेवाडी पर्यंत गेली तर वाळू घेणाऱ्याला दहा ते अकरा हजार रुपये मोजावे लागतात. एवढेच काय नदीपासून किलो दीड किलोमीटर अंतरावर वाळू टाकायची असल्यास तब्बल पाच हजार रुपये एका   ट्रॉलीचे द्यावे लागत आहेत. त्यामुळे हे वाळू माफिया दररोज लाखभर रुपये सरासरी कमवत आहेत.

जोर्वे येथील वाळू तस्करीत अनेक मोठे मासे असल्याची शक्यता वारंवार चर्चिली जात आहे. दिवस-रात्र वाळू तस्करी या भागातून कशी काय सुरू रहाते. याला स्थानिक महसूलचा तलाठी  व इतर कर्मचारी या वाळू तस्करांना सामील आहे की काय ? अशी शंका या भागातील नागरिक आता उघडपणे बोलत आहे   .यावरून या बेकायदा वाळू उपशाची तीव्रता लक्षात येते. प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने नदी काठावरील २४ तास चालणाऱ्या विहिरी भर पावसाळ्यात काही तासांवर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे वाटोळे होण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. याचे सोयरे सुतक या वाळू माफियांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नसल्याने ही वाळू तस्करी बंद होण्याऐवजी त्यात भर पडत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते.

विना नंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉल्यांचा उपयोग

या बेकायदा वाळू तस्करीसाठी वाळू माफिया विना नंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा उपयोग करतात. त्यामुळे एखाद्याने ठरवूनही या ट्रॅक्टरचे आणि ट्रॉलीचे नंबर मिळत नाहीत. अनेकदा ह्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांवर वाहतुकीचे कुठलेही नियम माहित नसलेले अल्पवयीन मुले चालक म्हणून काम करतात. त्यामुळे अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. यासाठी महसूलच्या अधिकाऱ्यांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button