शेवगाव तालुक्यातील ताजनापूर उपसा सिंचन योजनेत वरूर, आखेगाव सह १० गावांचा समावेश होणार!

जनशक्ती विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश – हर्षदाताई काकडे
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, श्री.ज.म.पाटील यांनी दि.२४. रोजी शेवगाव तालुक्यातील ताजनापूर उपसा सिंचन टप्पा क्र. ०१ मधील वरूर, आखेगाव सह १० गावांच्या समावेशासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी निविदा काढली असून जनशक्ती विकास आघाडी व वरील १० गावातील शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची माहिती लाडजळगाव गटाच्या मा.जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली .
यावेळी बोलताना सौ.काकडे म्हणाल्या की, आज शासनाने वरील निविदा वरुर बु, वरूर खु, आखेगाव (डोंगर, तितर्फा), खरडगाव, सालवडगाव, मुर्शदपूर, हसनापूर, थाटे, वाडगाव या गावांना ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.१ चे पाणी मिळावे व सदर गावातील बंधारे, गाव तलाव भरून मिळावेत या मागणीसाठी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर यांचे कार्यालयावर ‘क्रांती दिनी’ दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘प्रदक्षिणा व मुक्काम ठोको आंदोलन’ केले होते.
तसेच याच प्रश्नासाठी दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता श्री.मिसाळ साहेब यांना नाशिक येथे वरील गावातील शेकडो शेतकऱ्यांनी समक्ष भेटून निवेदन दिले
व गोदावरी तीरावर गंगामातेची गोंधळ घालून पूजा अर्चना करून ‘गंगामाई आमच्या शेतात ये’ अशी मागणी केली होती. तसेच शासनाकडेही वेळोवेळी या मागणीसाठी पाठपुरावा केलेला होता.
शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार होऊन शासनाने आज निविदा काढली आहे याचा आनंद आम्हा सर्वांना होत आहे. तसेच आता या योजनेमधील गावातील शेतकऱ्यांना आता पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
या योजनेमुळे दुष्काळी गावातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यांच्या शेतीचा, जनावरांचे चाऱ्याचा, पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे व संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून आपले आपले गावातील तलाव बंधारे दाखवावेत असेही सौ.काकडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले असून अधिकाऱ्यांचे आभारही यावेळी त्यांनी मानले.