इतर

शिक्षणाबरोबर खेळाला प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

शिर्डी, दि.१ – खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त रहात असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक), प्रवरानगर या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदार नितीन भोसले, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुश्मिता विखे पाटील, लॉर्सन अॅण्ड टुर्ब्राचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर, पद्मश्री डॉ .विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष कैलास तांबे पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, नियमित मैदानावर गेल्यास निराशा दूर होते आणि शरीर-मन तंदुरुस्त राहते. मैदानात आपणास जय व पराजय अशा दोन्ही गोष्टी शिकायला मिळतात. चांगल्या गोष्टींसाठी धाडस आवश्यक असते, धाडसाने यश संपादन करता येते. त्यामुळे तरुणांनी संघर्षाला धैर्याने सामोरे जावे. आई- वडील आणि समाजाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पूर्वी शिक्षणाची गुणवत्ता प्रामुख्याने मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. मात्र, आज लहान गावांमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले असल्याचे मंत्री श्री.पाटील म्हणाले.

यावेळी डॉ.सुश्मिता विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, अरविंद पारगावकर यांचीही भाषणे झाले.

प्रास्ताविकात प्राचार्य व्ही.आर.राठी यांनी अभियांत्रिकी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली.

तत्पूर्वी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन मंत्री श्री‌. पाटील यांच्या हस्ते झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button