
अकोले प्रतिनिधी
- शाहूनगर व तालुक्यातील २५ पेक्षा जास्त गावातील अवैध दारू न थांबल्यास आज स्थगित झालेले उपोषण २ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू होईल असा इशारा अकोले तालुका दारुबंदी आंदोलनाने पोलीस व उत्पादनशुल्क विभागाला दिला.
शाहूनगरमध्ये आजपर्यंत दारूने २३ मृत्यू झाले तरी ७ ठिकाणी दारूविक्री सुरू आहे.तालुक्यात संगमनेर वरून इंदोरी फाटा व विरगाव फाट्यावर दारू येऊन तालुक्यात वितरित होते याबाबत ठोस कारवाई होत नसल्याबद्दल १५ ऑगस्टला दारूने विधवा झालेल्या महिलांचे उपोषण हेरंबकुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.या उपोषणात शाहूनगर मधील १००पेक्षा जास्त तरुण,महिला व सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनाला जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील व पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी भेट देऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यावेळी हेरंबकुलकर्णी यांनी दारू विकणारे तडीपार करा, इंदोरी फाटा व विरगाव फाट्यावरील हॉटेल कायद्याने सील करा, ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानाचा परवाना रद्द करा, दारूविक्री होणाऱ्या गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करा, अकोल्यात उत्पादनशुल्क चे कार्यालय स्थापन करा अशा मागण्या मांडल्या तर ऍड.वसंत मनकर यांनी २ ऑक्टोबर पर्यंत जर वरील मागण्यांवर समाधानकारक कारवाई न झाल्यास आज स्थगित झालेले उपोषण हे आमरण स्वरूपात गांधीजयंतीपासून २ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू होईल असा इशारा दिला व पंटरवर कारवाया न करता दारूविक्रेते यांच्यावर कराव्यात असे सांगितले.
संतोष मुतडक व विनय सावंत यांनी राजूर येथील दारुबंदीनंतर खुलेआम दारूविक्री कशी होते हे सांगून तिथले वास्तव सांगितले लिंगदेवच्या दारुबंदी चे चित्र बाळासाहेब कानवडे सर यांनी सांगितले. जालिंदर बोडके यांनी देवठाणमधील, पत्रकार मच्छीन्द्र देशमुख व सुनील गीते यांनी कोतुळ चे, प्रदीप हासे यांनी म्हाळादेवी येथील दारूचे वास्तव मांडले.
या सर्व प्रश्नांवर जिल्हा उत्पादनशुल्क अधीक्षक गणेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मदने यांनी वरील सर्व मागण्यांवर लवकरच कृती दिसेल व तालुक्यातीलअवैध दारूविक्रेते तडीपार केले जातील.संगमनेर येथील दारू दुकान व वाहतूक करणारे गुन्हेगार यांच्यावरही कारवाई केली जाईल.
यावेळी विधवा भगिनींनी अधिकाऱ्यांना राखी बांधून दारू बंद करण्याची डोळ्यात पाणी आणून साद घातली.

शेवटी सर्व अधिकाऱयांनी महिला व तरुणांसोबत संपूर्ण वस्तीत मार्च काढला,महिलांनी दारू बंद करा या घोषणा दिल्या.महिला व तरुणांनी दारूचा थेंबही विकू देणार नाही असा संकल्प केला.चैतन्य महिला गटाच्या महिलांनी सहभागी होत दारूविरोधी गाणी सादर केली.
या उपोषणात हेरंबकुलकर्णी,वसंत मनकर शांताराम गजे,खंडूबाबा वाकचौरे, नगरसेविका प्रतिभा मनकर,जनाबाई मोहिते, संगीता साळवे,नाजूबाई साळवे,लक्षण आव्हाड,सुदर्शन पवार,अजय मोहिते, प्रमोद मंडलिक,सुरेश आढाव, मच्छीन्द्र पवार,शरद पवार, ,गणेश कानवडे, मनोज गायकवाड, कविता चव्हाण सुभान शेख,प्रतिमा कुलकर्णी व सामाजिक राजकीय कार्यकर्ते सामील झाले होते.
