अन्न माता ममताबाई भांगरे अनोखा स्वातंत्र दिन

मूग , उडीद , राजगिरा , मसूर
या बियांचा वापर करून बनविला तिरंगा
राजूर/प्रतिनिधी-
आजादीचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र आनंदात साजरा होत असताना अकोले जिल्हा अहमदनगर येथील आदिवासी भागातील अन्न माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई देवराम भांगरे यांनी आपल्या परिवारासह घरी बनवलेल्या राष्ट्रीय ध्वज तिरंगा लहानग्यांच्या हातात देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने अमृत महोत्सव साजरा केला
. पारंपारिक बियाण्यांचा अतिशय कलाकुसरीने वापर करत या माऊलीने तिरंगा साकारला होता. राष्ट्रप्रेम आणि देश भावना प्रत्यक्ष कृतीतून आणि शेती म्हणजेच आमचा श्वास आहे हे दाखवून देत त्यांनी आजादीचा अमृत महोत्सव आनंदात साजरा केला. अतिशय दुर्मिळ असलेल्या वाणांचा म्हणजेच मूग , उडीद , राजगिरा , मसूर या बियांचा वापर करून त्यांनी तिरंगा साकारला होता .त्यांनी पारंपरिक बियाणे संग्रह करून व बीज निर्मिती करत त्यांचे गरीब शेतकऱ्यांना वितरण करणे हे त्यांचे आवडते क्षेत्र आहे. त्यांनी साकारलेली परसबाग देश व विदेशातही प्रसिद्ध आहे.
शेतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ममता बाईंनी सेंद्रिय शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून छोट्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीचे मॉडेल देवगाव येथे उभे केले आहे. हजारो दीनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे. आपल्या सोबतच इतर शेतकऱ्यांची शेती बहरावी म्हणून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. नुकतेच त्यांना झी मीडियाचा उंच माझा झोका सन्मानाने गौरवण्यात आलेले आहे. बीज तिरंगा ही संकल्पना परिसरातील शेतकऱ्यांना मनापासून भावली आहे. अपेक्षा आहे की या तिरंग्याचे अनुकरण करून आपण करत असलेले कार्य देश भावनेने व देशहित लक्षात घेऊन केले पाहिजे.–
———