घरकूल वसाहतीचा हा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी ठरला मार्गदर्शक!

सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत..
सुनील गीते
“”””””””””””””
एकेकाळी पाटाच्या पाण्यामुळे नेहमी दलदल, चिखल असलेल्या जागेवर आता आदर्श अशी शासकीय घरकूल वसाहत साकार झाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक
येथील ‘सिंधूताई आदिवासी निवारा ’असे या घरकूल वसाहतीचे नांव आहे.
एकाच ठिकाणी पंतप्रधान, शबरी व रमाई आवास योजनेच्या ५७ लाभार्थ्यांना घरकूले उपलब्ध करून देणारा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. ‘‘पूर्वीच्या मातीच्या घरातील गळक्या छतांमुळे या ठिकाणी निवास करणं कठीण
झालं होतं. आता शासनामुळे हक्काचा कायमस्वरूपी निवारा मिळाल्यामुळे जगणं सुकर झालं आहे. आनंद झाला आहे. जीवनात समाधान आहे.’’ अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

लोणी गावातील सोनगाव रस्त्यावरील गावालगत असलेल्या शासकीय जागेवर काही आदिवासी व इतर समाजातील कुटुंब गेली अनेक वर्षापासून माती व कुडाच्या सारवलेल्या घरात वास्तव्य करून होती. या कुटुंबानी घरकूल योजनेसाठी
राहाता पंचायत समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला ; मात्र शासकीय जागा लाभार्थ्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना लाभ मिळू शकत नव्हता. लाभार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री, सध्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडले. त्यावर महसूलमंत्र्यांनी लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीला सदरची जागेचा सातबारा
लाभार्थ्यांच्या नावे ठराव करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामपंचायतीने ठराव केल्यानंतर घरकूल योजनेचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लोणी ग्रामपंचायत व
लाभार्थ्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. प्रत्यक्षात २१ फेब्रुवारी २०१९ रोजी लोणी बुद्रूक येथील गट नंबर १५/१ व १५/२ मधील १५.९७ हेक्टर शासकीय जमीन प्रधानमंत्री आवास योजना – ३४, शबरी आवास योजना
– २२ व रमाई आवास योजना- १ अशा ५७ लाभार्थ्यांना घरकूल योजनेसाठी मंजूर करण्यात आली. १ डिसेंबर २०१९ रोजी या शासकीय घरकूल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात १५ जून २०२१ रोजी ५७ घरकूल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश झाला.

या घरकूल वसाहतीविषयी राहाता गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले की, ‘सिंधूताई आदिवासी निवारा’ शासकीय घरकूल वसाहतीचे बांधकाम आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, गवंडी प्रशिक्षण व रोजगार हमी योजना आदी
सरकारी योजनांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार अशा पूरक सोयी-सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय बक्षिस रक्कम, राहाता पंचायत समितीच्या यशवंत पंचायत राज अभियानाची बक्षिस रक्कम व १५ व्या वित्त आयोगामधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. प्रत्येकास ३०० चौरस फूटाचे घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशस्त प्रवेशद्वार असलेल्या या शासकीय गृहसंकुलातील प्रत्येक घरकुलासमोर पुरेशी मोकळी जागा आहे. परिसरात नारळ, वड, पिंपळ आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सध्या सर्व ५७
लाभार्थी या ठिकाणी वास्तव्य करून आहेत.
या घरकूल वसाहतीत वास्तव्य करणारे शबरी आवास योजनेचे लाभार्थी सोपान नामदेव गवळी यांनी आपली भावना व्यक्त केली की, ‘‘शासनानं जागेवरचं हक्काचं पक्के घर बांधून दिलं. त्यामुळे जीवनात स्थिरता आली आहे.’’प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी सुनिता राजेंद्र मोरे यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘‘पूर्वी चिखल, पाण्यातून बाहेर जाता येत नव्हते.घरांच्या भींती पडून शेळ्या-मेंढ्या दाबल्या गेल्या ; मात्र आता पक्का
निवारा मिळाल्यामुळे मनात भीती राहिली नाही.’’
शबरी आवास योजनेत घर मिळालेले लाभार्थी कमल गंगाधर बोरसे यांनी सांगितले की, ‘‘पूर्वी छप्पराचे घर होते. दरवर्षी छपरावर पाचट इकडून-तिकडून गोळा करावं लागतं होतं. पाऊस-पाणी झाल्यावर साऱ्या घरात पाणी शिरायचं आता ;
मात्र शासनानं पक्के घर दिल्यामुळे आम्हाला दोन घास सुखा-समाधानाने खाता येत आहेत.’’
शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित कृतीसंगम केल्यास निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होतो. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने हातात हात घालून प्रयत्न केल्यास अशक्य अशा गोष्टी देखील सहजचं शक्य
होतात हे लोणी बुद्रूक येथील घरकूल योजनेच्या पॅटर्न वरून दिसून येते. घरकूल वसाहतीचा हा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे