डांगी बैलांची राजधानी खिरविरे येथे बैलपोळा उत्साहात साजरा….

अकोले प्रतिनिधी
बैलपोळा हा शेतकरी राजाचा सर्वात आवडता सण महाराष्ट्रात खेडोपाडी उत्साहात साजरा केला जातो. याच सणाचे औचित्य साधून आपल्या बळीराजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत त्याची पूजाअर्चा केली जाते. अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या व डांगी बैलांच्या पैदासीसाठी प्रसिद्ध असलेल्या खीरविरे गावात पारंपारिक डांगी बैलांचा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या समोर आपल्या लाडक्या बैलांना सवाद्य मिरवून दर्शन घडवले जाते. येथील शेतकरी अतिशय प्रेमाने आपल्या बळीराजाची काळजी घेत असतो. बैलपोळा सण म्हटलं की संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण संचारते. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व दूर नदी नाल्यांना भरपूर पाणी वाहत असते. या पाण्यामध्ये आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना साज चढवला जातो. शिंगाना बेगड लावून त्यावर रंगीत कागदांची सुंदर सजावट केली जाते. कपाळावरती सुंदर व चमचमते बाशिंग बांधले जाते. पाठीवर सुंदर कलाकुसर असलेली झुल चढवली जाते. गळ्यामध्ये कवड्यांच्या व फुलांच्या सुंदर माळा गुंफल्या जातात. शरीरावर विविध रंगांनी सजावट केली जाते. मुळातच डांगी प्रजातीला निसर्गानेच अतिशय सुंदर रंग दिलेले आहेत. मुख्यत्वे करून सफेद आणि काळा रंग असलेले डांगी बळीराजा सर्वांना आकर्षित करतो. डांगी बैलांची शरीर रचना निसर्गाने प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणारी बनवली आहे. अति पावसात , थंडी -वाऱ्यात आणि जमिनीच्या तीव्र उतारावर ही प्रजाती तग धरू शकते. डांगी प्रजातीचे बैल त्यांच्या खुरांची
वैशिष्ट्यपूर्णरचना व शरीरावरील तेलकट त्वचा यामुळे अति पर्जन्यमानातही काम करू शकतात. तेलकट पाहिजे मुळे पावसाचे पाणी निथळून जाण्यास मदत होते. खुरे तुलनेने छोटी व काटक असल्याने तीव्र उतारावर व चिखलात जाऊन शेतीची कामे ते करू शकतात. या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे व नैसर्गिक देणगीमुळे डांगी प्रजाती या भागासाठी वरदान ठरलेली आहे. बहुसंख्य शेतकरी छोटे व अल्पभूधारक असल्याने ट्रॅक्टर सारखे महागडी अवजारे ते सांभाळू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये डांगी पशुधन टिकवणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळेच श्रावणी बैलपोळ्याला संपूर्ण आदिवासी भागामध्ये प्रचंड महत्व दिले जाते. वर्षात येणाऱ्या अनेक सणांपैकी शेतकरी राजाचा सर्वात आवडता सण म्हणून बैलपोळा याकडे बघितले जाते.खीरविरे या पारंपरिक डांगी पैदाशीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. बदलत्या हवामानामुळे शेतीचे उत्पन्न घटत चालले आहे. चाऱ्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालल्याने डांगी पैदाशीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. असे मत खीरविरे येथील पशुधन तज्ञ दिनेश शहा यांनी व्यक्त केले आहे. शासनाने याची दखल घेऊन डांगी प्रजाती बचाव कार्य हाती घेतले पाहिजे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी केले.