आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवा- केंद्रीय मंत्र्यां कडे केली मागणी

[ विजय खंडागळे]
सोनई प्रतिनिधी
आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत मा.केंद्रिय सूचना व प्रसारण मंत्री यांना अहमदनगर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख श्री.बाबासाहेब खराडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री.संदीप निचित यांच्या मार्फत आकाशवाणीचे श्रोते,लेखक,कवी,सामाजिक कार्यकर्ते,कलावंत व नैमित्तिक निवेदक व हंगामी कर्मचारी यांनी लेखी निवेदन दिले.
स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवावे कारण त्यामुळे स्थानिक कलाकार,साहित्यिक,तज्ज्ञ,शेतकरी,श्रोते यांना लगेच वाव मिळतो आणि त्यामुळे स्थानिक माहिती मिळते,ज्ञान मिळते,संस्कृतीचा विकास व संवर्धन होते असे म्हटले आहे. स्थानिक संस्कृतीची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती मिळते.संध्याकाळचे स्थानिक प्रसारण बंद करून मुंबई व दिल्ली केंद्रावरून जे सहक्षेपण (रिले) सुरू आहे ते श्रोत्यांमध्ये नाराजी वाढवत आहे असे ही या निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर न्यू आर्ट्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.खासेराव शितोळे,शिक्षक नेते श्री.प्रशांत म्हस्के,नाट्य दिग्दर्शक श्याम शिंदे, नाट्य कलावंत संजय लोळगे,श्रोते भाऊसाहेब नवथर,किरण वीर,लक्ष्मण जगताप, हरिभाऊ बिडवे,अशोक पाटील यांनी सह्या केल्या आहेत अशी माहिती जेष्ठ हंगामी निवेदक व ऑल इंडिया रेडिओ कॅज्युअल अंनौन्सर अँड कॅम्पेरर या राष्ट्रीय युनियनच्या अहमदनगर शाखेचे जिल्हा अध्यक्ष आदिनाथ अन्नदाते यांनी दिली.
या वेळी आकाशवाणीचे श्रोते भाऊसाहेब नवथर,शिक्षक नेते प्रशांत म्हस्के,हंगामी निवेदक शशिकांत जाधव, अतुल सातपुते, संजय वैरागर, सोमनाथ कांडके, वर्षा बांगर, रेखा शेटे, गौरी जोशी, अंजली बडवे, वंदना साबळे, शीतल शिंदे, भारती कुलकर्णी, प्रज्ञा असनिकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. प्राची शेकटकर, गजानन गारुळे,वृषाली घनवट, आदीं उपस्थित होते.