देवटाकळीत भोजपुरी गीताचे चित्रीकरण

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या देवटाकळी येथे गाव शेती शेतातील डोलणारे पिके व नदी परिसरातील नुकत्याच अवकाळी पावसाने उन्हाळ्यातही खळखळ वाहणारे पाणी, देवटाकळी येथील मंदिर परिसर नसिर सय्यद यांच्या किराणा मालाचे दुकान व काही महत्त्वाच्या ठिकाणी भोजपुरी चित्रपटासाठी गीताचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले.याच परिसरातील भायगाव या ठिकाणी यापूर्वी रिमा अमरापुरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीवर प्रकाश टाकणारे ‘रानफूल’ या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करुन ती प्रदर्शितही करण्यात आली होती. ग्रामीण भागातील काही महत्त्वाच्या अशा ठिकाणाची शहरी कलाकारांना भुरळ पडते व ते चित्रीकरणासाठी येतात यावेळी ग्रामीण भागातील लोक त्यांना आदरतिथ्य देऊन त्यांचे स्वागत करतात.

त्यामुळे शहरी कलाकारांना ग्रामीण भागाविषयी नेहमीच आकर्षण राहिले आहे.नुकत्याच भोजपुरी संपूर्ण गीतासाठी देवटाकळी परिसरातील चित्रीकरण करण्यात आले. या गीतामध्ये मुख्य नायक म्हणून आदित्य थोटे तर मुख्य नायिका शर्मिला माळी हे दिसणार असून सहकलाकार म्हणून बजरंग तांदळे व विकी अगस्त्या हे असणार आहेत या गीताचे दिग्दर्शन कृष्णा जवरे यांनी केले आहे तर छायाचित्रण व संकलन दादा नवघरे यांनी केले आहे.
कलेबरोबर मेहनतही महत्वाची
तरुणांनी या क्षेत्रात येताना हे क्षेत्र समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी लागणारी मेहनत अभ्यास व तंत्र या सर्व गोष्टीचा मेळ घातला गेला पाहिजे. भूमिका करताना त्या भूमिकेशी समरस होऊन आपण स्वतःच त्या भूमिकेशी एकरूपता दाखवल्याशिवाय ती प्रेक्षकांच्या मनात भरत नाही. त्यासाठी लागणारे तंत्र हे अतिशय महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात कलेबरोबर मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे.
कृष्णा जवरे वाडगावकर
गीत दिग्दर्शक