इतर

अकोले विधानसभा मतदारसंघ माकपला सोडा : कॉ. सदाशिव साबळे


अकोले प्रतिनिधी

अकोले तालुका हा डाव्या विचाराचा तालुका आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने दिलेला कौल डाव्या व पुरोगामी विचाराला अधोरेखित करणारा ठरला आहे. मागील पिढीने कम्युनिस्ट व समाजवादी विचाराची लढाऊ पेरणी अकोल्याच्या मातीत केली असल्याने व २००१ पासून माकपच्या नेतृत्वाखाली तोच डावा विचार विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे व लढ्यांच्या माध्यमातून सातत्याने बळकट होत गेल्याने सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्ष व संघटनांच्या योगदानातून तालुक्याने धर्मांध व जातीय विचारला निवडणुकांमध्ये नाकारलेले दिसते आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेली २४ वर्ष कधीही वैचारिक तडजोड न करता श्रमिक, शेतकरी, कष्टकरी जनतेची असंख्य आंदोलने अकोल्याच्या मातीत यशस्वी केली आहेत. दुध, कांदा, उस, सिंचन, कर्जमुक्ती, वनजमीन, गायरान व गावठाण घरांच्या तळ जमिनी, रेशन, पेंशन यासारख्या असंख्य प्रश्नांवर पक्षाच्या संघटनांनी यशस्वी लढे केले आहेत. अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अत्यंत लढाऊ संघटना गेली २४ वर्ष बांधल्या आहेत. महिला, विद्यार्थी व युवकांच्या वाड्या वस्त्यांवर संघटना मजबूत केल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पक्षाला महाविकास आघाडीने संधी दिल्यास सर्व समविचारी पक्षांच्या सहकार्याने तालुक्यात तत्वनिष्ट राजकारणाचा विजय नक्की होईल.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहकार्य केले. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण पाठींबा देत विजय सुनिश्चित करण्यात योगदान दिले आहे. आता मित्र पक्षांनी या पार्श्वभूमीवर माकपला पाठींबा देत मैत्री निभवावी अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

पक्षाकडे २४ वर्षाच्या लढाऊ चळवळीतून तावून सुलाखून निघालेले संभाव्य उमेदवार आहेत. कॉ. नामदेव भांगरे व कॉ. तुळशीराम कातोरे यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवून चांगली मते पूर्वी घेतली आहेत. समशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांचे डी.वाय.एफ.आय. या युवक संघटनेच्या माध्यमातून अकोले व संगमनेर तालुक्यात व्यापक काम आहे. महाविकास आघाडीने या सर्व बाबींचा विचार करून पक्षाला संधी द्यावी अशी मागणी पक्षाने राज्य समितीमार्फत केली आहे.

माकपची दिनांक १३ ते १५ जून या कालावधीत मुंबई येथे राज्य समितीची बैठक होत असून पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू व डॉ. अशोक ढवळे बैठकीला हजर असणार आहेत. बैठकीत अकोले विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढण्याबाबत ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे असे कॉ. सदाशिव साबळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button