परीक्षा पे चर्चा -2023 चे 27 जानेवारी 2023 ला आयोजन -केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

150 हून अधिक देशांतील विद्यार्थी, 51 देशांतील शिक्षक आणि 50 देशांतील पालकांची नोंदणी
नवी दिल्ली– शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी पंतप्रधानांचा संवादात्मक कार्यक्रम असलेल्या “परीक्षा पे चर्चा 2023” या कार्यक्रमाचे 6 वे पर्व 27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या परीक्षा पे चर्चा या अनोख्या संवादात्मक कार्यक्रमामध्ये ,देशभरातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक पंतप्रधानांशी परीक्षा आणि शाळेनंतरच्या जीवनाशी संबंधित चिंतांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधतात. परीक्षा हा जीवनातील उत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम तणावावर मात करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेल्या पाच वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.150 हून अधिक देशांतील विद्यार्थी, 51 देशांतील शिक्षक आणि 50 देशांतील पालकांची परीक्षा पे चर्चा 2023 साठी नोंदणी केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.