संगमनेरात काँग्रेस मध्ये निष्ठावंतांची उपेक्षा , त्याच त्याच कार्यकर्त्यांना सत्तेचे गुलाबजामुन !

संगमनेरात काँग्रेस ची शिवसेना होऊ नये ?
चंद्रकांत शिंदे पाटील
संगमनेर दि२०
संगमनेर तालुक्यात नुकत्याच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडीत नवीन चेहऱ्यांना स्थान मिळेल असे वाटत असतानाच प्रस्थापित असणाऱ्या त्याच त्याच कार्यकर्त्यांना सत्तेचे (पदांचे) गुलाब जामुन चाखायला मिळाल्याने निष्ठावंतांवर तोंडातील लाळ घोटण्याची वेळ आली आहे
. त्यामुळे काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते दुरावण्याची शक्यता निर्माण झाली असून संगमनेरात काँग्रेसची शिवसेना होते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली ३५/४० वर्ष संगमनेर शहर व तालुक्यावर राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व टिकवण्यासाठी शहरातील आणि तालुक्यातील अनेक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आमदार थोरात यांनी तयार केले आहेत. या कार्यकर्त्यांनी ही काँग्रेस पक्ष व आमदार थोरातांवर आपली निष्ठा कायम ठेवत त्यांना प्रत्येक निवडणुकीत ताकद दिली आहे. यातील काही कार्यकर्त्यांना आमदार थोरात यांनी विविध संस्थांमध्ये तसेच पक्षीय संघटनेत काम करण्याची संधी दिली मात्र हे करत असताना काही कार्यकर्त्यांना वारंवार संधी दिली तर काही कार्यकर्त्यांना थोरांताकडून दुर्लक्षित करण्यात आले वारंवार आपल्यावर अन्याय झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांची झाली होती. मात्र गत आठ पंधरा दिवसापूर्वी शहरातील वसंत लॉन्स येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या जुन्यांचा मेळ घातला पाहिजे, आता मीच पाहिजे असं कोणी म्हणू नये, ज्यांनी अनेक वर्ष निवडणुका जिंकल्या, पदे भूषवली त्यांनी आता स्वतःहून पायउतार व्हावे आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या एका वक्तव्याने दुर्लक्षित असणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपल्याला संधी मिळेल असे वाटत होते.
मात्र नुकत्याच झालेल्या शहर आणि तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था निष्ठावंत कार्यकर्त्यांची झाली आहे.
राज्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या विविध पदांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या यामध्ये संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे १५ वर्ष चेअरमन राहिलेले तसेच सध्या जिल्हा बँकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन असलेले माधवराव कानवडे यांचे चिरंजीव संगमनेर खुर्द गटातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असणारे सोमेश्वर दिवटे यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर तालुका आणि शहर काँग्रेसच्या इतर पदांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या या नियुक्त्या करंताना अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच स्थान मिळाल्याने इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
. पदे दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरात एकापेक्षा अधिक पदे आहेत. यातील कोणतेही एक पद त्या कार्यकर्त्याला ठेवून त्याच्याकडील उर्वरित पदे इतर कार्यकर्त्यांना दिल्यास कार्यकर्ते खुश राहतील यासाठी “एक व्यक्ती एक पद” हे धोरण संगमनेर तालुक्यात राबवण्याची गरज या निमित्ताने पुढे आली आहे. येत्या काही काळात संगमनेर नगरपालिकेची तसेच अहमदनगर जिल्हा परिषद व संगमनेर पंचायत समितीची निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरी तरुण नव्या चेहऱ्यांना स्थान मिळणार का ? का या ठिकाणीही प्रस्थापित कार्यकर्त्यांनाच स्थान दिले जाणार असा संतप्त सवालही अनेक कार्यकर्त्यांनी विचारला असून अनेकदा अन्याय होऊन ही केवळ साहेबांवर प्रेम म्हणून अनेकांनी या गोष्टी आत्तापर्यंत सहन केल्या मात्र आता सहन होत नाही. संगमनेर तालुक्यात भविष्यात काँग्रेसची शिवसेना होऊ नये याची दखल तरी साहेबांनी घ्यायला हवी अशा भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या
पक्षीय पातळीवर काम करताना तालुक्यात व शहरात नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल हा समज गोड गैरसमज ठरला आहे. अनेकांना वारंवार पदे दिले जात असल्याने अद्याप पर्यंत कुठलेही पद न मिळालेले अनेक कार्यकर्ते सध्या नाराज असल्याची चर्चा शहर आणि तालुक्यात होत आहे