टोल वसुली जोमात,नगर कल्याण महामार्ग खड्यांमुळे कोमात.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगर राहुरी या भागातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी जवळचा नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील अणे माळशेज पट्ट्यातील कल्याण- नगर हा अत्यंत महत्वाचा महामार्ग २४ तास वर्दळीचा असून महामार्गांवर मढ (ता. जुन्नर )ते माळशेज घाटापर्यंत रस्त्याला प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत, गेली कित्येक महिन्यापासून हे खड्डे प्रवाशांना कमालीचे त्रासदायक ठरत असून याकडे संबधीत रस्ते बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनधारक चालक मालक सांगत आहेत.
सदरचा मार्ग पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्याची वाहन चालकांची पूर्वीपासून मागणी आहे,तसेच रस्ता खराब आहे तरीही टोल वसुली (पठाणी वसुलीप्रमाणे )सुरूच आहे.
रस्ते विकसित करताना त्या रस्त्याची डागडुजी ची जबाबदारी देखील त्या ठेकेदार व टोल प्रशासनाची असते मात्र नगर कल्याण हायवेवर टोलवसुली जोमात केली जात असून सदर रस्ता खड्यांमुळे पूर्णपणे कोमात गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मराठवाडा विभागातून मुंबईकडे जाणारा हा महत्वपूर्ण महामार्ग असून हजारोंच्या संख्येतील वहाने या रस्त्यावर दिवसभर ये-जा करीत असतात, सदरच्या रस्त्याच्या देखभालीकडे गेली कित्तेक महिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष व टाळाटाळ केली जात असल्याने वाहनधारकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. टोल नाक्यावर पैसे मोजून खराब रस्त्यावर वाहन घेऊन चालावे लागत असल्याने व वहानामध्ये वारंवार बिघाड होण्याच्या प्रकारांना उधाण आले आहे,
दरम्यान पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र वहातुक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारां जवळ व्यक्त केली आहे.