दुर्गामाता महोत्सव पारनेरचा सांस्कृतिक ठेवा
आमदार नीलेश लंके

दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहरात दुर्गामाता मित्रमंडळाच्या वतीने गेल्या चाळीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेला दुर्गामाता महोत्सव पारनेरचा सांस्कृतिक ठेवा असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. हा महोत्सव अधिकाधिक मोठ्या, भव्य स्वरूपात साजरा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपण महोत्सवाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन आमदार लंके यांनी दिली.
महोत्सवाची सांगता आमदार लंके यांच्या हस्ते महाआरती करून झाली.यावेळी ते बोलत होते.
शिक्षकनेते रा.या.औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,बबन शेख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे,पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते,नगरसेवक अशोक चेडे,भूषण शेलार,श्रीकांत चौरे,संदीप मगर,भाऊ साठे, गणेश कावरे, डॉ. सादिक राजे, वैभव गायकवाड, रमीज राजे, अमित जाधव,बापू सोबले, स्वाती मुळे, आदी उपस्थित होते.उद्योजक सहदेव तराळ यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला. आमदार लंके म्हणाले की, गेली दोन वर्षे विविध सण,उत्सहांवर कोरोना संसर्गाचे सावट होते.महाविकास आघाडीने कोरोना जागतिक महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती उत्तमरित्या हाताळली त्यामुळे राज्यातले जनजीवन पूर्वपदावर आले.आपण आता सण,उत्सव उत्साहात साजरे करीत आहोत असे आमदार लंके म्हणाले.
पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे म्हणाले की, दुर्गामाता उत्सवाचे हे चाळीसावे वर्ष आहे.एखादा उपक्रम,उत्सव सुरू करणे सोपे असले तरी हा उत्सव सातत्याने चार दशके आदर्श पध्दतीने राबवणे कौतुकास्पद आहे.धार्मिकतेबरोबरच पारनेरकरांचे दुर्गामाता उत्सवाशी भावनिक नाते असल्याचे वाघमारे म्हणाले.
•आगामी वर्ष सुख समाधानाचे जावो…
विजयादशमीच्या शुभेच्छा देताना आमदार लंके यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांना आगामी वर्ष सुख समाधानाचे जावो, रोगराईपासून जनतेचे रक्षण व्हावे यासाठी दुर्गामाता चरणी प्रार्थना केली
गेल्या अनेक वर्षात यावर्षी प्रथमच चातुर्मासाच्या निमित्ताने शहरातील दोन्ही जैन श्रावक संघात जैन मुनींचे वास्तव आहे.त्याठिकाणी नियमितपणे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.दोन पैकी एका श्रावक संघाशेजारी दुर्गामाता उत्सवाचा मंडप होता.तर दुसऱ्या श्रावक संघाची उत्सव स्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे.या दोन्ही श्रावक संघात वास्तव्यास असलेल्या जैन मुनींना त्रास होऊ नये म्हणून दुर्गामाता मित्रमंडळाने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले नाही.सामाजिक भान राखत दुर्गामाता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जैन धर्मियांच्या भावनांचा आदर केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.