कोळगाव येथे पळसा नदीला पुन्हा एकदा मोठा पूर….

अंकुश तुपे
श्रीगोंदा / प्रतिनिधी
कोळगाव येथे सायंकाळी साडेतीनच्या सुमारास पळसा नदीला बारा दिवसांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुराचे पाणी पुलावरून वेगाने व मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक अनेक तास खोळंबून होती.
कोळगाव येथील पळसा नदीला बारा दिवसांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. भापकरवाडी, वेठेकरवाडी येथे मोठा पाऊस झाल्याने हस्तनक्षत्रातील या मोठ्या पावसाने पळसा नदीला पूर पहावयास मिळाला. तीनच्या सुमारास कोळगाव मध्ये फक्त पंधरा मिनिटे पाऊस झाला आणि अचानकच पळसा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. ग्रामस्थ पुराचे पाणी पाहून अचंबित झाले व पुराचे पाणी पाहण्यासाठी सगळ्यांनी पूलाकडे धाव घेतली. भापकरवाडी, वेठेकरवाडी येथे झालेल्या मोठ्या पावसाने पुराचे पाणी पळसा नदीच्या पात्रात वाहत होते. अनेकांनी यावेळी लाईव्ह शूटिंग,फोटो काढून समाज माध्यमावर टाकण्याचा आनंद घेतला.अशा पद्धतीचा पूर गेल्या पंधरा ते वीस वर्षात आलेला नव्हता असे जाणकार व्यक्तींनी या ठिकाणी सांगितले. या पाण्यामध्ये एका दुचाकी वाहन चालकाने आपली गाडी घालण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी तो स्कुटीसह थोडक्यात वाचला. पुराचे पाणी जरी ग्रामस्थांना पहावयास मिळाले असले तरी सध्याचा पाऊस हा नुकसानकारक आहे. शेतातील कांदा लागवड तसेच सोयाबीन, मूग, बाजरी, विविध प्रकारचे फुले यांना नुकसान करणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी बियाणे खरेदी केलेली होती, औषध फवारणी खते टाकलेली होती, परंतु खरिपाचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची, शेतजमिनीची पाहणी करून तातडीने पंचनामे करून अधिकाऱ्यांनी त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे व माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी केली आहे.