इतर

नवरात्री उत्सवानंतर कळसुबाई शिखर केले कचरामुक्त….

अकोले प्रतिनिधी

देशभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना देवीचा जागर गावोगावी व अनेक मंदिरांमध्ये केला गेला. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असलेले ठिकाण कळसुबाई लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाशिक, ठाणे , अहमदनगर , पुणे येथून मोठ्या प्रमाणावर भाविक नवरात्रीत देवीचे दर्शन घ्यायला येत असतात . गेली दोन वर्ष करोनाच्या संकटामुळे भाविक गडावर येऊ शकले नाहीत. परंतु यावर्षी बारी व जहागीरदार वाडी ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळांनी व बचत गटातील महिला यांनी नवरात्री उत्सवात देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी खास सोय केली होती.

यात्रा उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शिखरावर पोहोचले होते. भाविकांची लोटलेली अलोट गर्दी व भाविकांनी सोबत आणलेले खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी संपल्यानंतर परिसरामध्ये या वस्तू टाकून दिल्याने कळसुबाई शिखराचे पावित्र्य व स्वच्छता धोक्यात आली होती. देवीला अर्पण करण्यासाठी नारळ , फुले , हार व इतर वस्तू या सर्वांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. कळसुबाई परिसर व निसर्गाचे पावित्र्य राखण्यासाठी गावातील तरुण मंडळ तसेच महिला बचत गट सरसावले. आपले गाव सुंदर आणि स्वच्छ राहावे यासाठी या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले.नवरात्री नंतर कळसूबाई शिखराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेमध्ये माऊली महिला बचतगट गट व गावातील इतर बचत गटांनी स्वयम स्फूर्तीने सहभाग नोंदवला

. ही स्वच्छता मोहीम कळसुबाईच्या शिखरापासून सुरू करण्यात आली. स्वच्छतेची ही मोहीम माची मंदिर पर्यंत करण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थांचे आवरण , खाद्यपदार्थ आणलेले कागद , पत्रावळ्या , द्रोण , बिस्किट ची आवरणे , नारळाच्या शेंड्या, प्लास्टिक पिशव्या इत्यादी पर्यावरणाला घातक कचरा गोळा करण्यात आला. तब्बल ५० गोण्या कचरा गोळा करून गडावरून तो खाली आणण्यात आला. गावामध्ये आणून या कचऱ्याची योग्य वेल्हेवाट लावण्यात आली. प्लॅस्टिक बॉटल एकत्र करून त्यांची वेगळी साठवणूक केली. स्वच्छता मोहिमेला माऊली बचत गटाच्या अध्यक्ष शालिनी खाडे व गटातील सक्रिय सदस्य इंदुबाई घाणे, धोंडाबाई खाडे, नंदाबाई खाडे, भागाबाई खाडे यांनी सहभाग नोंदवला. याचप्रमाणे कळसूआई तरुण मित्रमंडळा कडून नवरात्रीचे नऊ दिवस स्वयंसेवक पूर्ण दिवस गडावर निस्वार्थीपणाने सेवा देत होते. गर्दीवर नियंत्रण मिळवणे , कोणाला दुखापत झाल्यास मदत करणे, अडचणीतील लोकांना मदत पोहोचवणे, स्वच्छता व टापटीपणा टिकवण्यासाठी पर्यटकांना सूचना देणे यामध्ये या तरुण मित्रांनी सहकार्य केले. मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी पंढरीनाथ खाडे – ग्रामपंचायत सदस्य जहागीरदारवाडी , हिरामण खाडे , बाळू घोडे, विमल घोडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. गाव पातळीवर स्वच्छता मोहीम व सामुदायिक आरोग्य याविषयी मुंबई स्थित ऐ. एस. के फाउंडेशन व बायफ संस्था पुणे यांचे ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button