पारनेर तालुक्यातील निघोज सेवा संस्थेत मयत सभासदांना नफा वाटप केल्याचा अजब प्रकार!

!
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील निघोज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गत संचालक मंडळाने सुमारे साडेपाचशे मयत सभासदांना नफा वाटप केल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे
याप्रकरणी पारनेर येथील न्यायालयाने फौजदारी संहितेच्या ( कलम २०२ ) प्रमाणे पारनेर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत . निघोज येथील बबन उर्फ किसन पाटीलबा कवाद या सभासदाने याप्रकरणी सहकार खाते व पोलीसांकडे तक्रार केली होती परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी पारनेर न्यायालयात याप्रकरणी धाव घेत खाजगी फिर्याद दाखल केली आहे . न्यायालयात कवाद यांनी दिलेल्या फारर्यादीवर सुनावणी झाली .त्यावेळी मयतांना नफा कसा वाटप केला जातो याविषयीचा युक्तिवाद करण्यात आला . गेल्या काही वर्षांपासून मयत सभासदांची नावे कमी न करता त्यांच्या शेअर्स रकमेवर मिळणाऱ्या नफ्याचे त्यांनाच वाटप केल्याची कागदपत्रे संचालक मंडळाकडून तयार केली जात होती . मयत सभासदांचा शेअर्स रकमा वारसांना वर्ग न करता , त्यांच्या परस्पर नफा वाटपात हा अपहार केला जात होता . विशेष म्हणजे हा नफा मयतांना रोख स्वरूपात दिल्याचे दाखवण्यात येत होते . त्यांच्या बनावट सह्या यावेळी करण्यात येत होत्या . अशी माहिती, माहीती अधिकारातून समोर आली आहे . असे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे . गेल्या आठ वर्षांपूर्वी याच संस्थेत बोगस कर्जमाफी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते . आता मयतांना नफा वाटपाच्या प्रकारामुळे निघोज सेवा संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . याप्रकरणाची सुनावणी पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस. सी . साळवी यांच्यासमोर झाली . तक्रारदार यांच्यावतीने वकील गणेश कावरे यांनी बाजू मांडली .
पोलिसांनी चौकशी करून एक महिन्याचे आत न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे .त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे .