शब्दगंधच्या वतीने पाडव्यानिमित्त उत्सव कवितेचा : शानदार काव्यसंमेलनचे आयोजन

सोनई– [ विजय खंडागळे]
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त खास काव्यरसिकांसाठी उत्सव कवितेचा काव्यसंमेलन होणार असून या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक एस. बी. शेटे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक २५/१०/२०२२ रोजी दुपारी चार वाजता कोहिनूर मंगल कार्यालय पाईपलाईन रोड अहमदनगर येथे काव्य संमेलन होणार आहे अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने विविध साहित्यिक उपक्रम राबवून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात येते. त्याच बरोबर ज्येष्ठांना मानसन्मान देऊन त्यांचे साहित्य इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातात.मागील काही वर्षांपासून पाडव्यानिमित्त होणारे शब्दगंधचे काव्यसंमेलन साहित्य क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवत असून यावेळी खास काव्य रसिकांसाठी उत्सव कवितेचा हे काव्यसंमेलन घेण्यात येत आहे.
सोनई येथील ज्येष्ठ साहित्यिक एस.बी.शेटे हे ग्रामीण साहित्यिक आहेत. ते मुळा सह साखर कारखाना येथुन कृषी विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले असून विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. यशवंत वाचनालयाचे ते संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत. सूत्रसंचालक, नाट्य कलावंत म्हणूनही एस.बी.शेटे परिचित आहेत.
कवयित्री शर्मिला गोसावी या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचलन करणार असुन संमेलनामध्ये शांताराम खामकर, प्रकाश घोडके,डॉ. शंकर चव्हाण, महेश कुलकर्णी, शिरीष जाधव, डॉ. कैलास दौंड, चंद्रकांत पालवे, ऋता ठाकूर, प्राचार्य चंद्रकांत भोसले, बाळासाहेब मांतोडे, आत्माराम शेवाळे, प्रशांत वाघ ,अण्णा संत, रज्जाक शेख, माधव सावंत, अमोल आगाशे, निवृत्ती श्रीमंदिलकर , मारुती सावंत, अरविंद गाडेकर,बाळासाहेब कोठुळे, मृणाल गोडांबे, अरविंद ब्राह्मणे,भास्कर निर्मळ, पी.एन. डफळ, बेबीताई गायकवाड, दादा ननवरे,हरिभाऊ नजन, कृष्ण अमृते, बाळासाहेब अमृते, अजयकुमार पवार, सुनील कुमार धस,राजेंद्र फंड,स्वाती ठुबे, सुभाष सोनवणे इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत.
तरी उत्सव कवितेचा या काव्य संमेलनाचा आस्वाद साहित्यिक व साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत, डॉ.अशोक कानडे, डॉ. तुकाराम गोंदकर, किशोर डोंगरे, रामकिसन माने, बबनराव गिरी आणि ज्ञानदेव पांडुळे यांनी केले आहे.