राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील , प्रा. राम शिंदे मंत्री होणार ?

चंद्रकांत शिंदे पाटील
संगमनेर दि ११
कुणाच्याही ध्यानीमनी नसंताना पंधरा दिवसाच्या आश्चर्यकारक राजकीय सत्तानाट्या नंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आले. जशी राज्यातील सत्तेचे गणिते बदलली तशी आता अहमदनगर जिल्ह्यातील सत्ता केंद्र बदलणार आहेत. लवकरच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रा. राम शिंदे ह्या उत्तर आणि दक्षिण नगर जिल्ह्यातील भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण नगर जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार तत्कालीन नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अल्पमतात आल्यावर महाविकास आघाडी सरकारला सत्तेच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईचा खास चार्टर्ड विमानाने प्रवास करून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ४० आणि काही अपक्षांच्या पाठबळावर भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा अधिकचे संख्या बळ असूनही भाजपाने एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री पदावर आपले समाधान मानत अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेच्या शिखरावरून खाली खेचण्यात यश मिळवले. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापासून संभ्रमावस्थेत असणाऱ्या जिल्ह्यातील भाजपाला मोठी उभारी मिळाली. राज्याचे सत्तेचे समीकरणे बदलल्यावर जिल्ह्यातील भाजपाच्या नेतृत्वाला राज्य पातळीवर संधी मिळणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि दक्षिणेतून माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी शिवसेना-भाजपा युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात देखील कृषी आणि शिक्षण मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे. मात्र गत तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान त्यांनी काँग्रेसची साथ सोडत “सबका साथ सबका विकास” सांगणाऱ्या भाजपाच्या संगतीत जाणे पसंत केले आणि अल्पवधीत राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या मातब्बर असणाऱ्या तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी विखेंना वेळोवेळी ताकद देण्याचे काम केले. नगर जिल्ह्याला विखे, थोरात राजकीय संघर्ष नवा नाही. त्यामुळे भाजपाने थोरात यांचे जिल्ह्यावर असणारे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी विखेंना पाठबळ देण्याची भूमिका स्वीकारली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपा युतीने सर्वाधिक संख्याबळ मिळवुनही सत्तेच्या वाटपावरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास भाजपापासून दूर गेला. भाजपा- शिवसेना युती तुटली आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात झाला. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी आलेली संधी शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपाला गमवावी लागली. परिणामी आपसूकच राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपदाची हुलकावणी बसली मात्र आता अडीच वर्षानंतर का होईना शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर विखे पाटलांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांच्याकडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले व त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने विधानपरिषदेत सर्वाधिक मते घेऊन पोहोचलेले प्रा. राम शिंदे यांनाही दक्षिणेतून मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रा. राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील व विश्वासातील आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नातवाला भविष्यात शह देण्यासाठी प्रा. राम शिंदे यांना या ना त्या कारणाने राजकीय बळ देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी करत असतात. त्यामुळे प्रा. राम शिंदे यांची वर्णी नव्या मंत्रिमंडळात लागणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांनीही आधी गृहराज्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री होत जलसंधारण खातं सांभाळलं होतं. विखे पाटील आणि प्रा. राम शिंदे हे दोघेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील असल्याने खाते कोणतेही असो मात्र उत्तरेतुन राधाकृष्ण विखे पाटील आणि दक्षिणेतुन प्रा. राम शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून दिसतील हे मात्र नक्की.
लवकरच राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकात कोणत्या पक्षांची सरशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.