पारनेर तालुक्यात 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या कामाची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पारनेर तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामात अनागोंदी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 15 व्या वित्त आयोगातून मंजुर झालेली कामे, अपूर्ण कामांची यादी, मंजूर आराखड्यात बदल केलेल्या कामाची यादी, मंजूर केलेले मासिक इतिवृत्त, सदरील कामे कोणत्या एजन्सीला दिली त्याची नावे, प्रत्येक कामाचा चाचणी अहवाल, सर्व कामे मुदतीत झाले आहे का? याची तपासणी विभागीय स्तरावरून करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.