कळसुबाई शिखरावर आदिवासी बांधवांच्या उपजिविकेवर वनविभागाची कु-हाड!

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणुन प्रसिद्ध असणा-या कळसुबाई शिखरावर आदिवासी बांधवांच्या उपजिविकेचे साधन असलेल्या दुकानावर वनविभागाने कुऱ्हाड चालविली

राजुरच्या प्रादेशिक वनविभाने ही कु-हाड चालविली असुन गडावर स्थानिक आदिवासीं कुटुंबानी रोजगार निर्मितीसाठी उभे केलेले दुकांन अतिक्रमण असल्याचे म्हणत हे अतिक्रमण काढुन टाकलेआहेत .त्यामुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणा-या बारी व जहागिरदारवाडी येथील आदिवासी तरुणांच्या रोजगाराचा पुन्हा प्रश्न उभा राहीला आहे .

अकोले तालुक्यातील कळसुबाई हे महाराष्ट्राचे ऐवरेस्ट समजले जाते .उन्हाळा , पावसाळा या तिनही ऋतुत या एवरेस्टवर चढाईसाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते .हे शिखर चढण्यासाठी तीन तासांचा अवधी लागत असुन उतरण्यासाठीही तितकाच वेळ लागतो . त्यामुळे या चढाईसाठी आलेल्या पर्यटकांची सोय व्हावी व आपलीही रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने बारी व जहागिरदार वाडीतील अनेक आदिवासी कुटुंबांनी माचीपासुन ते गडावर असणा-या विहीरीपर्यंत छोटे मोठे टपरीवजा लाकडांच्या लहान लहान झोपड्या बनविल्या आहेत . त्यामधुन पर्यटकांना लिंबु पाणी , सरबत व वडापाव सारख्या खाद्यपदार्थ व जलपेयाची सुविधा आदीवासी बांधव देत असतात .

पंरतु या आदिवासी बांधवांच्या रोजगारीवरच राजुर येथील प्रादेशिक वनविभागाकडुन कु-हाड चालविली गेली असुन ही छोटी छोटी दुकाने वनविभागाकडुन काढुन टाकण्यात आली आहेत .ही दुकाने हटविताना वनविभागाकडुन कोणतीही सुचना दिली गेली नसल्याने आदिवासी दुकानदार सांगत असुन वनविभागाकडुन मात्र अतिक्रमणे काढताना प्रत्येक दुकानदारास नवरात्रोत्सव कालावधीतच सुचना देण्यात आल्या होत्या अशी माहीती वनपरिमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण यांनी दिली आहे .कळसुबाई शिकरावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई वरिष्ठ स्तरावरुन झाली असुन सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संदिप पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचा दुजोरा वनविभाने दिला आहे .तर कळसुबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही दुकानदाराकडुन गडावर पावित्र्य राखले जात नसल्याचा आरोप केला असुन गडावर लावले जात असलेले टेंट धारक टेंटमध्ये मद्याच्या बाटल्यांचा वापर करताना परीसरात स्वच्छता ठेवत नसल्याचे कारण देत तसे पत्र वनविभागाला कळसुबाई देवस्थानच्या वतीने देण्यात आले आहे . वनविभागाच्या कारवाईचे देवस्थान ट्रस्टने स्वागत केले असुन अतिक्रमण केलेल्या दुकानदारावर शासकिय कामात अडथळा म्हणुन गुन्हे दाखल करावेत असेही देवस्थानचे म्हणणे आहे .
तर कळसुबाई गडावर असणा-या शिड्यांची अवस्था ही अतिशय दयनिय झाली असुन जागोजागी तुटलेली आहे . रेलिंगही अनेक ठिकाणी गायब झाली आहे .शिड्याखाली पाण्याच्या बाटल्या व इतर कच-याचा ढिग साचलेला आहे . गडावर सर्वात जास्त अस्वच्छता असुन गडावर वनविभाग कधीच स्वच्छता मोहीम राबवत नसुन कायम स्थानिकांकडूनच स्वच्छता करुन घेतली जाते . प्रत्येक शनिवारी व रविवारी कळसुबाई शिखराला पर्यटकांच्या गर्दीने जत्रेचे स्वरुप आलेले असते .पाच हजार पर्यटक एकाच आठवड्यात गडावर चढाई करतात .पण या गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी वनविभागाकडुन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे स्थानिक दुकानदार सांगतात.गडावर जाण्यासाठी जो रस्ता आहे तोही खराब झाला आहे .कुठेही वनविभागाने मार्गदर्शक फलकही लावलेले नाही . वनविभागाने अगोदर गडावर पर्यटन कसे वाढेल याचा विचार करुन स्थानिकांच्या रोजगारात वाढ कशी होईल याचा विचार करावा .कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थानिक तरुणांसाठी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे वेगवेगळ्या कल्पना अमलात आणुन स्थानिक तरुण रोजगारांपासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहेत . मग प्रादेशिक वनखाते दुटप्पी धोरण का राबवत आहे ? असाही सवाल या दुकानदाराकडुन केला जात आहे .रोजगार हा या पर्यटकांच्या जिवावरच उपलब्ध झाला असुन तो वनविभागाने हिसकावुन घेऊ नये व आमच्यावर आलेला उपासमारीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशीही मागणी अतिक्रमण तोडलेले दुकानदार करत आहेत .

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असुन या गडावर पर्यटकांकडुन सर्वात जास्त कचरा तयार होत असतो त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी वनविभागाने उचलावी .अन्यथा या कच-यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास मदत होईल….निलीमा जोरवर – गिर्यारोहक
