आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा…पारनेर साखर कारखाना बचाव समिती आक्रमक !

दत्ता ठुबे
पारनेर दि 22: तालुक्यातील देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता विशेष तपास पथकाची स्थापना करावी तसेच या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी पारनेर साखर कारखाना बचाव समितीने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे केली आहे.
समितीने अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेवून हि मागणी केली आहे.पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी फौजदारी कट करणे, फसवणूक, विश्वासघात, बनावटीकरण
याबाबतचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणात सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये रकमेचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यामुळे या संपुर्ण विक्री व्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट होणे आवश्यक आहे. अशी मागणी कारखाना बचाव समितीने केली आहे. या गंभीर गुन्ह्याच्या तपासाकरिता संबंधित क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहेत. पारनेर तालुका पोलीस दलाकडे त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. या विक्रीव्यवहारात वापरलेला पैसा कर चुकवलेला आहे. त्या संपुर्ण रकमेचा मनी ट्रेल ( मागोवा ) शोधण्यासाठी या व्यवहाराचे तज्ञांमार्फत फॉरेन्सिक ऑडिट होणे आवश्यक आहे. या विक्री व्यवहारात बँकेने कारखान्यावर विनाकारण कर्जाचा फुगवटा निर्माण करणे, बनावट गहाणखत तयार करणे, विशिष्ट खरेदीदाराच्या फायद्याची विक्री प्रक्रीया राबवणे, खरेदीदाराकडून कर चुकवलेला पैसा थेट स्वीकारणे, त्याच खरेदीदाराला कर्ज पुरवठा करणे,
मालमत्तेच्या मूल्यांकनाहुन दहापट अधिक कर्ज पुरवठा करणे, खरेदीदार कंपनीला क्षमता नसताना कारखान्याची विक्री करणे, विक्री व्यवहारात बनावट सातबारा वापरणे, या बाबींचे सखोल विश्लेषण / तपास आवश्यक आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील तज्ञ अधिकारी यांची एसआयटी ( विषेश पथक ) नेमणूक होण्याची मागणी कारखाना बचाव समितीने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गुन्ह्याचा उलगडा होण्याकरीता आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पारनेर पोलिस निरीक्षक तथा या गुन्ह्याचे सध्याचे तपासी अधिकारी समिर बारवकर तपास कामात फिर्यादीला
विश्वासात घेत नाहीत अशीही तक्रार निवेदनात केली आहे. आरोपींना तातडीने अटक न केल्या न केल्यास दि.२७ जानेवारीपासून पारनेर पोलीस ठाण्या बाहेर आमरण उपोषण चालु करण्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आलेला आहे.