कोतुळ येथे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान संपन्न आ. डॉ.लहामटे यांच्या हस्ते दाखले वाटप

कोतुळ/ प्रतिनिधी
आदिवासी गौरव वर्ष २०२५ निमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या वतीने धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले तसेच योजनांची माहिती देऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
शिबिरात आधार कार्ड नोंदणी, पीएम किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, पीएम गरीब कल्याण योजना, पीएम मातृवंदना योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम जनधन योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम जन्म आरोग्य योजना, जनधन बँक खाते उघडणे, रेशन कार्ड, घरकुल योजना, वीज कनेक्शन, सौर पंप अशा विविध योजनांचे लाभ देण्यात आले. तसेच २०२५-२६ या वर्षासाठी न्यूक्लिअस बजेट योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा पुरविण्यात आली. उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज वितरण करून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर, उमेद बचत गटाचे समन्वयक सोमनाथ गुंजाळ गावचे सरपंच तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात स्टेट बँक ऑफ इंडियावतीने 8 लाख कर्ज मंजूर करून वितरण आ. लहामते सह.प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर यांचे उपस्थित चेक देण्यात आला. तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, घरकुल आदेश आणि विविध योजनांचे लाभ पत्रक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज कुमार पैठणकर यांनी केले. सूत्रसंचालन सतीश कासार तर आभार प्रदर्शन राजेंद्र चौधरी यांनी केले.
.