आंभोळ गावच्या सरपंच पदी सुशिला खोकले यांची वर्णी!

कोतुळ दि २१
अकोले तालुक्यातील चुरशीच्या ठरलेल्या आंभोळ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाने एकहाती सत्ता आणत बाजी मारली आहे.
या पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करत शासनाचे बक्षीस मिळविण्याचा मानस सर्व युवा वर्गाने बाळगला होता. अनेक सभा घेऊन, समजुती काढत बिनविरोध साठी प्रयत्न केले गेले. परंतु ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आले आणि अखेर निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली.
दि. १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण सतरा उमेदवारांनी आमने सामने टक्कर दिली होती. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून दिले गेले असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. यामध्ये शेतकरी विकास मंडळाच्या सुशिला खोकले व अपक्ष उमेदवार सुनिता वाजे आमने सामने होत्या. खोकले यांना ९०० तर वाजे यांना ३७५ मते पडली आहेत. सुशिला खोकले विजयी झाल्या असून सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
प्रभाग एक मधून सर्वसाधारण पुरुष सदस्य पदासाठी सुनिल साबळे (३७८ मते) व अनुसूचित जमाती पुरुष सदस्य पदासाठी सिताराम लोहकरे (३७१ मते), प्रभाग दोन मधून सर्वसाधारण पुरुष सदस्य पदासाठी पांडुरंग साबळे (३३३ मते) तर प्रभाग तीन मधून अनुसूचित जमाती पुरुष सदस्य पदासाठी बाळू भोजने (२९३ मते) हे उमेदवार भरघोस मताधिक्य घेत विजयी झाले आहेत.
मेमाणे संगिता (अनुसूचित जमाती महिला) वाजे सुनिता (अनुसूचित जमाती महिला), चौधरी सविता (सर्वसाधारण महिला), भवारी आशा (अनुसूचित जमाती महिला), साबळे सुनिता (सर्वसाधारण महिला) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.