बोगस आदिवासी विरोधात राज्यव्यापी संघर्ष उभा राहणार !

बोगस आदिवासींना शिंदे- फडणविस सरकार संरक्षण देत आहे
अकोलेतून माकप चे कार्यकर्ते होणार सहभागी.
अकोले प्रतिनिधी
३ जानेवारी २०२३ रोजी बोगस आदिवासी हटाव या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच्याच्या वतीने आयोजीत केलेल्या राज्यव्यापी बैठकीस अहमदनगर जिल्ह्यातुन, माकप, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डि.वाय.एफ.आय. व सीटु संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली अकोले व संगमनेर तालुक्यातून मिटिंगसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत.
राज्यामध्ये बोगस आदिवासींना शिंदे फडणविस सरकार संरक्षण देत असून खऱ्या आदिवासींवर अन्याय करत आहे. या विरोधात आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने योग्य भुमिका घेतली आहे.
बोगसांची घुसखोरी रोखा, खऱ्या आदिवासींना नोकऱ्या द्या ,या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, या मागण्यांसाठी राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
माकपचे राज्य सचिव उदय नारकर, आ. विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावित, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या मरीयम ढवळे बैठकीला हजर राहणार आहेत.
बोगस आदिवासीप्रश्नी जुन्नर येथे नुकताच राज्यव्यापी मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात ठरविल्याप्रमाणे राज्यव्यापी लढ्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचे नामदेव भांगरे ,एकनाथ मेंगाळ ,तुळशीराम कातोरे ,राजाराम गंभिरे यांनी सांगितले