राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन म्हणजे शिंदे- फडणवीस सरकारची दडपशाहीच………..

सरकारचे गैरव्यवहार आणि काळी कृत्ये झाकण्यासाठी दडपशाही -प्रताप उर्फ भैया माने
कागल, दि. २३:
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली .
येथील गैबी चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष नवल बोते, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, प्रविण काळबर यांची प्रमुख उपस्थिती होती .
प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला आला आहे. याचबरोबर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूखंड वाटपाचा निर्णय मागे घ्यावा लागला, याचा राग आणि नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधक आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही बाब निषेधार्ह आहे . हे सरकार पुढील काही दिवसात बरखास्त होणारच आहे.
यावेळी “दडपशाही करणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारचा धिक्कार असो…..”, “शिंदे- फडणवीस सरकारच करायचं काय……? खाली डोकं -वर पाय……!” अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.