इतर

पालकमंत्री राधाकृष्ण विखे वर मनसे नेत्याचा गंभीर आरोप; केली थेट राजीनाम्याची मागणी

नगर:- नगरमधील मनसे नेत्याने राज्याचे महसूलमंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नगर शहर आणि जिल्ह्यात दंगली, खून, दरोडे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास पालकमंत्री विखे पाटील अपयशी ठरले असल्याचा आरोप करत या सर्व घटनांची जबाबदारी घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव पदावर असलेले नितिन भुतारे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना भुतारे म्हणाले, “नगर शहर, जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दंगली घडत आहेत. अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत. दरोडे, खून अशा अनेक प्रकारांमुळे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे”.

“अशा घटना घडत असल्यामुळे नगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी काय घडेल, याचा भरोसा राहिलेला नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ते मुली-महिला या सर्वच भीतीच्या वातावरण आहेत, हे सर्व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून घडत आहे”, असा गंभीर आरोप भुतारे यांनी केला.

भाजपची सत्ता आल्यापासून धार्मिक दंगली घडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व घडत असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधा कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही.

नगर जिल्ह्यात एकट्या जून महिन्यात हत्या, दरोडे अशा खळबळ उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. शहरात आणि जिल्ह्यात चोऱ्या, चैन स्नॅचिंग, रस्तालूट अशा घटनांत वाढ झालेली दिसून येत आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे एकूण चित्र आहे.

विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत आणि निवेदन देत अवैध धंद्यांना आवर घालण्याची मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडूनही विखेंवर कडक शब्दात टीका करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button