१० लाखाची लाच स्वीकारणारे दोघे पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात!

कोल्हापूर दि २१
१० लाख रूपये लाच मागणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पोलिस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय केरबा कारंडे (वय ५०, रा. उचगाव, चौगले पार्क,टेंबलाईवाडीलगत) आणि किरण धोंडीराम गावडे (वय ३७, रा. केदारनगर, मोरेवाडी, करवीर) अशी त्याची नावे आहेत
. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीलगतच सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले
व्यवसायाने वकील असणाऱ्या तक्रारदार यांच्या मुलाचा वाहने दुरूस्ती, खरेदी विक्री व्यवसाय आहे. त्यांनी पनवेल येथून एक ‘स्पोर्टस् बाईक’ आणली होती. ते ती मोटारसायकल स्क्रॅप करणार होते. याची माहिती संशयित पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि पोलिस नाईक किरण गावडे या दोघांना मिळाली. त्यानी ती मोटारसायकल ताब्यात घेवून त्यांना गुन्हा दाखल करण्यात येईल, मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी भिती दाखवली.
सदर पोलिसांनी तक्रारदारांच्या मुलाला १८ जानेवारीला चौकशीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर सोडून दिले. लगेच दुसऱ्यादिवशीही पुन्हा बोलून घेतले. दिवसभर थांबवून सायंकाळी सोडून दिले होते
या कारवाई पासून वाचायचे असेल तर एकरकमी २५ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी याबाबत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने त्याची पडताळणी केली. दरम्यान तक्रारदारांनी ही रक्कम देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यानंतर पैशाची जमवाजमव केली. तक्रारदारांकडून ठरल्याप्रमाणे पोलीस कर्मचारी श्री कारंडे व गावडे या दोघांनी १० लाखांची लाचेची रक्कम स्विकारून ती मोटारीच्या डिक्कीत ठेवली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या दोघांना रंगेहात ताब्यात घेतल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले
. ही कारवाई बुधवंत यांच्यासह अमंलदार मयुर देसाई, नवनाथ कदम, विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने चालक सूरज अपराध आदींनी केली
.————