सासू व्हर्सेस सून’ पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा !

संगमनेर :- ‘सासू व्हर्सेस सून’ ह्या व्यंगचित्र पुस्तकात अनेक विनोदी प्रसंग आणि मार्मिक टिपण्णी व्यंगचित्रकार अरविंद यांनी केली आहे. एकाच विषयावर व्यंगचित्राचे पुस्तक काढणे हे कौतुकास्पद आहे. ‘सासू व्हर्सेस सून’ अतिशय चांगले व वाचनीय आहे ” असे उद्गार महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी काढले आहे.
येथील संगमनेर साहित्य परिषद तर्फे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या ‘सासू व्हर्सेस सून’ या व्यंगचित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा के.बी. (दादा) देशमुख सभागृहात झाला. या प्रसंगी सौ.दुर्गाताई तांबे, अनिल देशपांडे, डॉ.संतोष खेडलेकर, मैथिली सत्यजीत तांबे, अरविंद गाडेकर हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

त्याप्रसंगी प्रमुख अतिथी दुर्गाताई तांबे म्हणाल्या,” दहा वर्षापूर्वी जगविख्यात व्यंगचित्रकार स्वर्गवासी आर.के.लक्ष्मण यांनी अरविंद गाडेकर यांची चित्रे पाहिली आणि त्यांनी गाडेकरांचे कौतुक केले. व्यंगचित्रकलेत नवीन पिढी तयार झाली याचे आर.के.लक्ष्मण यांना समाधान वाटले. त्याप्रसंगी अनिल देशपांडे म्हणाले, ” व्यंगचित्रकार हे बोटांचे जादुगार आहेत. त्यांच्या बोटातून उतरलेले चित्र सामाजिक व राजकीय चमत्कार दाखवतात. डॉ.. संतोष खेडलेकर म्हणाले,” संगमनेर कला क्षेत्रात अनेकांनी महाराष्ट्रात ठसा उमटविलेला आहे परंतु व्यंगचित्र कलेत ठसा उमटविणारे गाडेकर हे एकमेव आहेत.
त्याप्रसंगी ‘सासू व्हर्सेस सून’ या पुस्तकाचे लेखक व चित्रकार अरविंद गाडेकर म्हणाले, “व्यंगचित्र म्हणजे मानवी जीवनातल्या विसंगतींवरचं सहृदय भाष्य आहे. ते रेषेतून आणि मोजक्या काही शब्दातून मांडून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी ‘सासू व्हर्सेस सून’ हे माझे व्यंगचित्र पुस्तक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन भाऊ हासे यांनी केले. याप्रसंगी पुष्पा निऱ्हाळी (सासू) आणि सुप्रिया गवांदे (सून) ची भूमिका साकारून सादर केलेल्या नाटिकेस उपस्थितांनी दाद दिली. सूत्रसंचलन सौ. संज्योत वैद्य यांनी केले. आभार प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले. या पुस्तक प्रकाशनास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.