गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अभय देवु नये, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाची मागणी

मुंबई-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे नियमित मंजूर रिक्त पदावर तसेच गरजेनुसार काम करत असलेल्या जुन्या व अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना एजन्सी बदलल्या नंतर कामावरुन कमी करू नये. तसेच नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे असे महावितरण चे पत्रक आहे.
सातारा येथे नवीन टेंडर प्रक्रिया राबवताना आर्थिक हेराफेरी सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेल्या व या प्रकरणात जेल मधून जामीनावर बाहेर आलेल्या कंत्राटदारांलाच महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालया अंतर्गत आलेल्या सातारा जिल्ह्यात कंत्राटी कामगार पुरवण्याचे कंत्राट पुन्हा देण्याची किमया काही अधिकारी वर्गाने केल्याची घटना समोर आली आहे.
सातारा येथील एका बड्या संघटनेशी संबंधित वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था चालक कंत्राटदाराला महावितरणच्या बड्या अधिकाऱ्यांच्या अभयामुळेच पुन्हा टेंडर मिळाल्यामुळे साताऱ्याच्या वीज कामगारांमध्ये मोठी खळबळ उडली आहे. मागील अनेक वर्षे याच संस्थेला इथे टेंडर मिळत आल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
असे भ्रष्ट कंत्राटदार त्यांच्या हस्तका करवी हस्ते परहस्ते जुन्या कंत्राटी कामगारांचे विविध क्लुप्त्या द्वारे आर्थिक शोषण करतात. या दहशतीला न जुमानता अशा प्रकारच्या आर्थिक मागणीची पूर्तता न करणाऱ्या निर्भीड कामगारांना अथवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वैमनस्य भावनेने कंत्राटदारां कडून जॉइनिंग लेटर दिले जात नाही. पर्यायाने जुन्या अनुभवी व कौशल्य प्राप्त कंत्राटी कामगारांना रोजगार मिळत नाही ही बाब आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत गंभीर असून या प्रकाराकडे अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात या मुळे आर्थिक लागे बांधे असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतो. या प्रकारा मुळे वीज कंपन्याची प्रतिमा देखील जनमानसात मलिन होते. या झाल्या प्रकाराची एक समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेची असल्याचे मत संघटने मार्फत व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे नुकतेच संपाच्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री निवास येथे झालेल्या मिटिंग मध्ये राज्यातील वीज कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचे खुद्द ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व प्रसार माध्यमांच्या समोरच मान्य केले होते. या बैठकीत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.
या बाबत अनेकदा संघटनेने ऊर्जामंत्री, प्रधान सचिव ऊर्जा, कामगार आयुक्त, शासननास व तिन्ही वीज कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाच्या वारंवार काही बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे आता ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब अथवा काय कारवाई करतात याकडे राज्यातील 40,000 वीज कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे. तरी जुन्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.