ग्रामीण मुसलमान लढतो अस्तित्वाची लढाई — शेख शफी बोल्डेकर

नाशिक येथे ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सम्पन्न
नाशिक : नाशिक येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद आयोजित ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष सुप्रसिध्द विचारवंत लेखक अब्दुल कादर मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी थाटात संपन्न झाले.
या साहित्य संमेलनामध्ये ” मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक , सांस्कृतिक ,सामाजिक अन्वयार्थ ” या नावाने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. फारूक शेख हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डाॅ.शकील शेख , प्राचार्य इ.जा.तांबोळी , सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक ,साहित्यिक शेख शफी बोल्डेकर हे होते.

यावेळी साहित्यपीठावरून बोलताना शफी बोल्डेकर यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास श्रोत्यासमोर मांडला. ग्रामीण भागात एकूण मुस्लिम संख्येच्या साठ टक्के समाज राहतो . हा ग्रामव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे.सामाजिक वातावरणात वावरत असताना कुठे सामाजिक सलोख्याचे तर कुठे आपण विभक्त आहोत असले दाहक अनुभव त्याच्या वाट्याला येतात. याच अनुभवाच्या बळावर तो मराठी भाषेतून साहित्य निर्मिती करतो . महाराष्ट्रातून लिहिणारे बहुतांश मुस्लिम मराठी साहित्यिक हे खेड्यापाड्यात राहणारे आहेत. यांच्या अस्तित्वाचे आर्थिक , शैक्षणिक ,सामाजिक प्रश्न इतरापेक्षा भिन्न आहेत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव गेल्या काही दशकापासून खेड्यापाड्यातही जाणवतो आहे. तरी खेड्यातील मुसलमान आजही बहुसंख्येने असलेल्या हिंदू बांधवासी सलोख्याने राहतो. हा एकोपा संत परंपरेचा वारसा आहे. पण शासन दरबारी मुस्लिम समाजाच्या विकासाविषयी निश्चित असा आराखडा असायला हवा तो नाही म्हणूनच मुस्लिम समाज आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसतो आहे .
मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे जनक सांगलीचे आमदार स्व. सय्यद आमिन , स्व.प्रा.फक्रुद्दीन बेन्नुर , डाॅ.अजीज नदाफ ,प्रा.फ.म.शहाजिंदे ,प्रा.जावेदपाशा कुरेशी , मुबारक शेख ,साबिर सोलापूरी , डाॅ.शेख इक्बाल मिन्ने , अजीम नवाज राही , डाॅ. हबीब भंडारे , रमजान मुल्ला , प्रा. सय्यद अल्लाउद्दीन , अॅड.हाशम पटेल , अनिसा शेख , खाजाभाई बागवान, डाॅ.सय्यद जब्बार पटेल , बा. ह. मगदूम , नसीम जमादार, मलेका शेख , दिलशाद सय्यद , बी.एल.खान , मुबारक उमराणी , रशीद तहसीलदार , इस्माईल शेख , जाफरसाहब चिखलीकर , सिराज शिकलगार , तहेसिन सय्यद , शबाना मुल्ला , गौसपाशा शेख , रजिया जमादार ,निलोफर फणिबंद , इक्बाल शेख ,मोहम्मद अब्दुल करीम , इस्माईल शेख , सायरा चौगुले , महेमुदा शेख , डाॅ.नुरजहाँ पठाण , फरजाना डांगे , दौलतभाई पठाण , इरफान शेख , अयुब नल्लामंदू , इंतेखाब फराश , अहमद पिरनसाहब शेख , चाँद तरोडेकर , शेख बिस्मिला सोनोशी , शेख निजाम गवंडगावकर या साहित्यिकांच्या साहित्यातून मुस्लिम समाजाचे चित्रण प्रकर्षाने दिसून येते .
यावेळी स्वागताध्यक्ष इरफान शेख , माजी खासदार हुसेन दलवाई , हसीब नदाफ , प्रा. युसूफ बेन्नूर , अरूण घोडेराव आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नीलोफर सय्यद यांनी केले.