आ. नीलेश लंके यांना भीमरत्न पुरस्कार जाहीर

६ मे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आमदार नीलेश लंके यांना गोवंडी, मुंबई येथील भीमप्रेरणा मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दि.६ मे रोजी सायंकाळी सात वाजता दत्तनगर गोवंडी येथे पार पडणाऱ्या दिमाखदार सोहळयात आ. लंके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रवीण रणशेवरे व सचिव दीपक चौकेकर यांनी आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आ. लंके यांच्या पुरस्कारासंबंधी कळविले आहे. आ. लंके यांचे समाजासाठीचे अभुतपूर्व कार्य तसेच राजकारण दुर ठेऊन कोरोना काळात हजारो रूग्णांना दिलेले जीवदान या सामाजिक बांधिलकीचे भीमप्रेरणा मित्र मंडळाने दखल घेतली आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आ. नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सुविधेमुळे राज्यभरातील हजारो रूग्णांना त्याचा फायदा झाला. घरातील सदस्य कोरोना बाधित रूग्णाजवळ जाण्यास धजावत नसताना कर्जुले हर्या व भाळवणी येथील कोव्हीड सेंटरमध्ये आ. लंके यांनी स्वतः थांबून रूग्णांची सेवा केली. त्यांच्याशी संवाद साधून आधार दिला. आ. लंके यांचे हे कार्य प्रसार माध्यमांतून सातासमुद्रापार गेले. त्यांच्या या आरोग्य मंदिरास जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल अनेक सेवाभावी संस्थांनी घेऊन आजवर त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. आता भीमरत्न पुरस्काराने आ. लंके हे मे महिन्यात सन्मानीत होणार आहेत.