भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवाची जय्यत तयारी !

संजय महानोर
भंडारदरा प्रतिनिधी
अकोल्यातील पश्चिमेला असणा-या सह्याद्रीच्या खो-यामध्ये गत काही वर्षापासुन काजवा महोत्सव जोर धरु लागला आहे . काजवा महोत्सव यावर्षी १५ मे पासुन कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजिव विभागाकडुन आयोजित करण्यात आला असुन या काजवा महोत्सवासाठी परीसरातील हाॅटेलधारक व टेंटधारक सज्ज झाले आहेत .
पंरतु यावर्षी निसर्गाचा रानमेवा व फळांचा राजा आंबा अद्यापही पाडाला न लागल्यामुळे भंडारद-याचा पाऊस यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता परीसरातील आदिवासी व्यक्तींनी व्यक्त केली आहे.त्यामुळेच भंडारद-याचा काजवा महोत्सव बरेच दिवस रेंगाळण्याची शक्यता आहे .
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरामध्ये कोरोनाचे वातावरण थंड झाल्यानंतर काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असले तरी पर्यावरणवादींनी काजवा हा किटक वाचावा व निसर्ग चक्र सुरळीत चालावे म्हणुन शोशल मिडीयावर ‘ काजवा बचाव ‘ या विषयावर लेख प्रसिद्ध केले आहेत .एका बाजुला काजवा महोत्सव आयोजक व दुस-या बाजुला पर्यावरणवादी असे दोन्ही गट एकाच वेळी सोशल मिडीयावर चमकताना दिसुन येत असल्यामुळे एक प्रकारे शोशल मिडीयावर काजव्यांचे युद्धच सुरु झाले की काय ? अशी परीस्थिती निर्माण झाली आहे .गाड्यांच्या प्रखर लाईट्स व कर्कश हाॅर्नमुळे काजव्यांचे अस्तित्वच संपुष्टात येत असल्याचे म्हणणे पर्यावरणवादींचे असुन काजवा कसा वाचविता येईल याचे नियोजन करत काजवा महोत्सवास आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती आयोजंकांकडुन उपलब्ध होत आहे . भंडारद-याच्या अभयारण्यात असणा-या स्थानिकांची उपजिविकाच पर्यटनावर अवलंबुन असल्याने काजवा महोत्सव व्यवस्थित पार पाडुन काजव्यांच्या कालचक्रावर थोडाही विपरीत परीणाम होणार नाही यासाठी नासिक वन्यजिव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यास सज्ज झाले आहेत . यासाठी वनविभागाच्या हद्दीत असणा-या ग्रामपंचायत व वनकमिट्यांची विशेष मदत घेण्यात येत आहे .काजवा ज्या परीसरातील झाडावर आढळुन येतो त्या ठिकाणापासुन कमीत कमी शंभर ते दिडशे मीटर अंतरावर गाडी पार्क करुन काजवे बघण्यासाठी पायी चालत जावे लागणार आहे.वनविभागाच्या हद्दीत दहा ते बारा ठिकाणी पार्कींग झोन उभारण्यात आले असुन पर्यटकांच्या वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी टोलनाकेही उभारण्यात आले आहेत.
भंडारद-याच्या वन्यजीव विभागाच्या अभयारण्यात दरवर्षी एप्रिल महिण्याच्या तिस-या आठवड्यातच डोंगरची काळी मैना ( करवंदे ) पिकण्यास सुरुवात होत असते .यावर्षी मात्र मे महिण्याचा पहिला आठवडा उलटुनही करंवंदे अद्यापही पिकलेली दिसुन येत नाही तर फळांचा राजा ‘ आंबा ‘ हा पाडव्यालाच पाडाला येत असतो , पंरतु यंदा मात्र आंबा अजुनही कुठे पिकलेला आढळुन येत नाही .उशिर झालेले हे निसर्गाचे कालचक्र निश्चितच विचार करण्याजोगे आहे . ज्यावर्षी आंबा करवंदे उशीरा पिकतात , त्यावर्षी पाऊस उशीरा सुरु होतो असे भंडारदरा परीसरातील अबालवृद्धांच्या तोंडुन ऐकावयास मिळत आहे . पाऊस जर उशीरा सुरु होणार असेल तर निश्चितच काजवा महोत्सव हा रेंगाळणार असुन भंडारद-याला मात्र पर्यटकांच्या रुपात चलती दिसणार आहे .म्हणुनच भंडारदरा परीसरातील टेंटधारक व हाॅटेल्स काजवा महोत्सवासाठी सज्ज झाली आहेत .