अनाथ मुलांचा अनोखा उपक्रम
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
(संगमनेर प्रतिनिधी)
मित्रांनो, गुरू ठाकूर चे हे शब्द तुम्हाला आठवतात? या ओळी गेले काही वर्ष मनात ठाण मांडून बसल्या आहेत. लिहिणारा लिहून जातो; पण त्याच ओळी कोणाचं तरी आयुष्य बनतात. ज्यांचं आभाळ हरवलंय, ज्यांना वाट कळतच नाहीये, अशांचा सारथी होणं म्हणजे खरी ईश्वर सेवा. याच अनुषंगाने, अनेक अनाथ मुलांचा सारथी होणारे एक व्यक्तीमत्व म्हणजेच “अनिकेत सेवाभावी मतिमंद अनाथ मुला मुलींचे अनाथ आश्रम” च्या संस्थापिका. ज्यांनी, बावधन, पुणे , येथे आपल्या सेवाभावी वृत्तीने आजवर अनेक अनाथ, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मुलांच आभाळ जिंकलय. आणि हे असाधारण व्यक्तीमत्व आहे, आदरणीय कल्पना ताई वर्पे. समाजाने, नातेवाईकांनी वेडे समजून सोडून दिलेल्या अनाथ मुलांचे संगोपन, कल्पना ताई गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय प्रामाणिकपणाने करतात. पण मंडळी, झालय उलटच ! एकूण कहाणी वाचून तुम्ही थक्क व्हाल आणि कल्पना ताईंच्या देदीप्यमान कार्याला व त्यांनी अनाथ मुलांवर केलेल्या संस्कारांना सलाम कराल. कारण ज्या अनाथ मुलांसाठी त्या कार्य आहेत त्याच अनाथ, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मुलांनी कल्पना वर्पे यांना सुखद अनुभव दिला. म्हणतात ना, “देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”.
झालं असं की, याच आश्रमातील मुलांना जेव्हा समजलं की, आपल्या सर्वांच्या लाडक्या कल्पना ताईंच्या वडिलांचा १ फेब्रुवारी रोजी,७५ वा वाढदिवस होणार आहे, तेव्हा त्या सर्वांनी कल्पना ताईंच्या मागे हट्ट लावला की आम्हाला पण वाढदिवस साजरा करण्यासाठी यायचं आहे. मुलांच्या आग्रहापुढे त्या ही नमल्या. आणि या सर्व अनाथ विद्यार्थ्यांनी एक फेब्रुवारीला, कल्पना ताईंचे वडील, संगमनेर तालुक्यातील, कनोली गावचे रहिवासी श्री चांगदेव भाऊ वर्पे यांचा ७५ वा वाढदिवस आगळ्यावेगळ्या स्वरूपात, लेझीम खेळत, ढोल ताशाच्या गजरात, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत साजरा केला. श्री चांगदेव भाऊ वर्पे हे उत्कृष्ठ सरकारी कर्मचारी म्हणून ओळखले जायचे. यासोबतच, त्यांनी एक प्रसिध्द बागायतदार शेतकरी, दानशूर तसेच कर्तव्यदक्ष पालक म्हणून समाजात एक नावलौकिक मिळवले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल सचिन सातपुते आणि साईश बाबासाहेब शिरोळे यांनी केले. याप्रसंगी चांगदेव भाऊ वर्पे यांच्या आप्तेष्टांनी आपल्या विविध कलागुणांना वाव देत आपल्यातील कलेमधून आपुलकीचे नाते व्यक्त केले. या कार्यक्रमाला विशेष प्रमुख उपस्थिती अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कल्पना वर्पे, शिक्षक संतोष डोंगरे सर, तनपुरे सर, शिक्षिका निकिता डोंगरे मॅडम तसेच इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. तसेच, प्रवरा हॉस्पिटल चे पीआरओ भरत वर्पे, प्रवरा मेडिकल कॉलेजचे डेप्युटी रजिस्ट्रार सतीश देशमुख, प्रवरा एज्युकेशन संस्थेचे कॉर्डिनेटर प्रशांत काकड, स्ट्रॉबेरी स्कूलचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सचिन सातपुते तसेच बाबासाहेब शिरोळे, पप्पू वर्पे, विकास वर्पे, दीप्तीश काकड आदी मान्यवर उपस्थित होते. चांगदेव भाऊ वर्पे यांच्या नातवांनी याप्रंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपल्या आजोबांच्या प्रती प्रेम व्यक्त केले. या अनाथ मुलांच्या आगमनामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. अतिशय आनंदात मुलांनी आजोबांचा वाढदिवस साजरा केला. मुलांच्या आगमनामुळे चांगदेव वर्पे यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आणि मुख्य म्हणजे आजोबांचं प्रेम मिळाल्याच्या भावनेने, मुलांच्या आनंदालाही पारावर राहिला नाही. ज्या मायेने कल्पना ताईंनी या चिमुकल्यांच्या पंखांना बळ दिलं, त्याची उतराई होणं अशक्य आहे पण या चिमुकल्यांनी साजरा केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे, कल्पना ताईंना “आजि मी ब्रम्ह पाहिले” ची अनुभूती आली असेल यात तीळ मात्र शंका नाही. खरोखर हा एक अविस्मरणीय वाढदिवस होता ! डोळ्यांचे पारणे फेडणारा सुवर्ण क्षण होता !!