थोरांताच्या भूमिकेने तरुण वर्गात नवचैतन्य ; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत नवे चेहरे दिसणार!

चंद्रकांत शिंदे पाटील
संगमनेर दि ११
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या जुन्यांचा मेळ घातला पाहिजे. आता मीच पाहिजे, असं कोणी म्हणू नये. ज्यांनी अनेक वर्ष निवडणुका जिंकल्या, पदे भूषवली. त्यांनी स्वतःहून आता पाय उतार व्हावे आणि आता नवीन तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यावी. हे करत असताना कोणीही नाराज होऊ नये असा प्रेमाचा सल्ला माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी जेष्ठ कार्यकर्त्यांना दिला.
आ. थोरांताच्या या भूमिकेने तालुक्यातील तरुण वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत आता काँग्रेस पक्षाकडुन नवीन चेहरे निवडणुकांच्या आखाड्यात दिसणार आहेत. संगमनेर शहर आणि तालुक्यात जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या संस्थांवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व आहे. यापूर्वी आ. थोरात यांच्याकडून तालुक्यातील जुन्या जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. ही संधी देताना आ. थोरात यांनी नव्या जुन्यांचा मेळ घातला. मात्र हा मेळ घालत असताना तरुणांना पाहिजे तशी संधी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे तरुण कार्यकर्ते इच्छा असूनही या संस्थांमध्ये काम करू शकत नव्हते. तरुणांमध्ये असणारी ही सल माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी अचूक हेरली आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना प्रेमाने सल्ला देत आता कुठेतरी थांबले पाहिजे असे सांगितले. हे सांगताना त्यांनी जेष्ठांनाही नाराज केले नाही तर आता कुठेतरी थांबले पाहिजे असे प्रेमाने सांगितले. थोरात यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील तरुण वर्गात मात्र मोठ्या प्रमाणात नवचैतन्य पसरले असून तालुक्यात तरुण काँग्रेस पक्ष उभा करण्याच्या थोरात यांच्या भूमिकेचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
येत्या काही काळात संगमनेर नगरपालिकेची तसेच अहमदनगर जिल्हा परिषद व संगमनेर पंचायत समितीची निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकात तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात स्थान मिळणार असल्याचे थोरात यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. गेली कित्येक वर्ष जुन्या जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्त्यांची पदावर जाण्याची अडवलेली वाट आता काही प्रमाणात सोयीस्कर झाल्याने तरुण कार्यकर्त्यानी आत्तापासूनच आपल्याला सोयीस्कर असणारी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच काँग्रेस पक्षात विविध पदावर तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वक्तव केले होते. त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी त्याची सुरुवात संगमनेरातून सुरू करणार असल्याचे सुतोवाच केल्याने संगमनेर शहर व तालुक्यात यापुढील काळात विविध संस्थांमध्ये तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पदावर काम करताना दिसतील यात शंका नाही. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत सुद्धा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिल्यास संगमनेरची काँग्रेस अधिक बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
एक व्यक्ती एक पद धोरण राबवण्याची गरज..!संगमनेर तालुक्यात माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जुन्या आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी आहे. मात्र यातील अनेक कार्यकर्त्यांच्या घरात एकापेक्षा अधिक पदे आहेत. यातील कोणतेही एक पद त्या कार्यकर्त्याला ठेवून त्याच्याकडील उर्वरित पदे इतर कार्यकर्त्यांना दिल्यास कार्यकर्ते खुश राहतील यासाठी एक व्यक्ती एक पद हे धोरण संगमनेर तालुक्यात राबवण्याची गरज या निमित्ताने पुढे आली आहे.