सरपंच पियूष गाजरे यांचे भाऊसाहेब डोंगरे यांना प्रत्युत्तर म्हणाले मालकाची मका आणि कोल्हे भुंकतय!

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ज्यांना ग्रामपंचायतीने रोजगार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केले त्याच व्यक्तीने सरपंचांवर टीका करणे म्हणजे मालकाची मका आणि भुंकतय कोल्हं असा प्रकार झाल्याचे प्रत्युत्तर सरपंच पियूष गाजरे यांनी भाऊसाहेब डोंगरे यांना दिले आहे.
काताळवेढा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेचे भूमिपुजन जिल्हा परीषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी केल्यानंतर त्यावर आक्षेप घेत सरपंच पियूष गाजरे यांनी टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना भाऊसाहेब डोंगरे यांनीही सरपंच गाजरे यांना सुनावले होते. डोंगरे यांनी केलेल्या आरोपांना सरपंच गाजरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जल जीवन योजनेचे सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर विहीरीच्या जागेची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असता रोजगार सेवक डोंगरे यांना माहीती देण्यासाठी पाठविण्यात आले होते. रोजगार सेवक हे कर्मचारी असतात अधिकारी नसतात हे डोंगरे यांनी लक्षात घ्यावे कोणीतरी स्क्रिप्ट लिहिली व त्यास डोंगरे यांचे नाव जोडले हे न समजण्याइतकी काताळवेढयाची जनता दुधखुळी नाही असा टोलाही गाजरे यांनी लगावला आहे.
▪️गेली पंधरा वर्षे सत्ता असताना तुम्ही काय दिवे लावले ?
विठ्ठलवाडी, गावठाण, खटाटे वस्तीचा रस्ताही यांना करता आला नाही. लोकांचा फक्त मतांसाठी वापर करून घेण्यात आला. ज्या विठ्ठलवाडी रस्त्याने रोजगार सेवक डोंगरे हे येतात तो रस्ता आम्ही पुर्ण केला आहे. मुख्य चौकात पेव्हर ब्लॉक, स्मशानभुमी सुशोभिकरण, सोसायटी इमारत ही आमची कामे. लोकनेते आ. नीलेश लंके यांच्यामार्फत विकास कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम आहे. बगलबच्च्यांनी वळवळ करू नये अशी टीकाही गाजरे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. नीलेश लंके यांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेस मंजुरी दिली. त्यामुळे त्याचे भुमिपुजन आ. लंके यांनी करावे अशी ग्रामपंचायतीची भुमिका आहे.मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी डोंगरे यांची धडपड असून जनता सर्व जाणते असेही गाजरे यांनी म्हटले आहे.
छटूर फटूरांकडे लक्ष देत नाही !
गावातल्या छटूर फटूरांच्या बोलण्याकडे आम्ही लक्षच देत नाही. त्यांची उंची किती हे गावाला माहिती आहे. त्यामुळे त्यांना किंमत देण्याचे काहीच कारण नाही. जनतेने आम्हाला कौल दिला त्यामुळे आम्ही विकास कामांना प्राधान्य देत आहोत. बुळंगट, विना कामाच्या लोकांवर काय बोलणार ?