रोटरी क्लब ऑफ नाशिकचा सहस्त्रचंद्र सोहळा साजरा; गरजू मुलींना ८० सायकलींचे वाटप

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सर्व माजी अध्यक्षांच्या सहकार्याने रोटरी संस्थेचा ८० वा वाढदिवस काल मंत्रोच्चार, गरजू मुलींना सायकल वाटप, व्हीलचेअर वितरण, बुद्धिवर्धक खेळ, मनोरंजन अशा विविध उपक्रमांनी प्रांतपाल राजिंदर खुराणा, उपप्रांतपाल ओंकार महाले अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सचिव शिल्पा पारख, हेमराज राजपूत, राजीव शर्मा आणि रोटरी डिस्ट्रिक्टच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
रोटरी क्लब ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाशिक व जिल्ह्यात सामाजिक कार्यात सातत्याने यशस्वीरित्या काम करतेय. संस्थेच्या गंजमाळ येथे पार पडलेल्या वाढदिवस कार्यक्रमात विविध शाळातील गरजू ८० विद्यार्थिनींना प्रांतपाल राजिंदर खुराणा, अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. मुलींना सायकल मिळाल्याने खेडोपाडी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आता शाळेत जाणे सोपे होणार आहे. त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता. अमित चौगुले आणि विनायक देवधर यांनी संपादित केलेल्या रोटेरीनामा मासिकाच्या ८०व्या आवृत्तीचे प्रकाशनही प्रांतपाल खुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. संदर्भ हॉस्पिटलमध्ये अपघात विभागात होणारी अडचण लक्षात घेऊन दोन व्हीलचेअर तेथील डॉक्टरांना हस्तांतरित करण्यात आल्या.

मुख्य सोहळ्यात सहस्त्रचंद्रदर्शन मंत्रोचाराच्या घोषात रोटरी क्लबचे संस्थापक नारायणराव विंचुरकर यांच्या प्रतिमेचे त्यांच्या चौथ्या पिढीतील नातवाच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबच्या सर्व उपस्थित माजी अध्यक्षांचा सत्कार आणि नाशिकमधील ज्येष्ठ रोटेरियनचा सत्कार करण्यात आला. सरस्वती वंदना आणि नृत्य गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या गेल्या ८० वर्षांच्या वाटचालीचा आढावा दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून सोनाली चिंधडे यांनी सादर केला. डॉ. श्रीया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंथलीडर डॉ. गौरी कुलकर्णी, पराग जोशी व अन्य सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

याप्रसंगी रोटरीनामा या स्मरणिकेचे प्रकाशनही मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आले. सर्वश्री विजय दिनानी, डॉ. विश्वजीत दळवी, विजय दीक्षित, सुधीर वाघ यांनी लाभार्थींना सायकली पोहचवण्याचे नियोजन केले. अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी अध्यक्षा डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी केली. याप्रसंगी माजी प्रांतपाल दादा देशमुख, रमेश मेहेर, राजीव शर्मा आणि रोटरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले. सचिव शिल्पा पारख यांनी आभार मानले.