भीमा नदी पात्रातील हत्याकांड, चुलत भावांनीच संपविले अख्खे कुटुंब, पाच आरोपीना अटक

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
भीमा नदीपात्रात दौंड तालुक्यातील पारगाव येथे
एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, या प्रकरणाचे धक्कदायक सत्य आता बाहेर आले
बदल्याच्या। सुडातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे समोर आले आहे. या हत्या कांडात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोहन पवार (वय ४५), त्याची पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू (५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले.
१७ तारखेला हे कुटुंब पारनेर तालुक्यातील निघोज मधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू बुडून झाला असल्याची नोंद आहे. मात्र हा प्रकार आत्महत्या की घातपात, याची चर्चा कायम होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. अधिक खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली. नातेवाईकांनीही हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते.
मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी पाच जणां वर गुन्हा नोंद करून अटक केली आहे.याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी रात्री निघोज येथून पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात वापरण्यात आलेली निघोज येथील पिक अप व्हॅनही ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३०), प्रकाश कल्याण पवार (वय ३२) आणि आणखी एक त्यांचा भाऊ (नाव समजू शकले नाही) व बहीण अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी हे मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितली नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा खून पवार कुटुंबियांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबियांना गावाला जाऊ, असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदीपात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी ७ जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नेमके कशाप्रकारे आरोपींनी मयताना मारले, त्यांच्या खुनामागे अजून इतर कारण आहे का, याबाबत पुणे ग्रामीण पोलीसांची गुन्हे शाखा तपास करत आहे.
मोहन पवार यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय २०) हा त्यांच्याच समाजातील महिलेसह १७ जानेवारीला लग्नाकरिता पळून गेला होता. त्यानंतर हे भयानक हत्याकांड घडले. त्यामुळे सुरुवातीला पवार कुुटुंबातील ७ जणांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मोहन पवार यांच्या चुलत भावांनीच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.