कोरोना एकल समितीच्या प्रयत्नाने बालसंगोपन अनुदानात भरीव वाढ

अकोले-वर्षभराच्या ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या’ पाठपुराव्याने अखेर बालसंगोपन योजनेचे अनुदान आता २२५० झाले आहे. एकल पालकांच्या मुलांना या योजनेत ११२५ रुपये मिळत होते. राज्यातील ५५००० मुलांना या वाढीचा लाभ मिळणार आहे अशी माहिती कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंबकुलकर्णी यांनी दिली.काल हा शासनआदेश निर्गमित करण्यात आला . बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख असताना त्यांनी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबीर घेतल्याने व कार्यकर्त्यानी प्रयत्न केल्याने एकट्या नगर जिल्ह्यात या योजनेचे ७००० लाभार्थी आहेत.
१६ सप्टेंबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या कोरोना एकल महिला समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी एकरकमी कोरोना विधवा महिलांना आर्थिक मदत केली तशी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केली.त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकरकमी मदत करण्यापेक्षा आपण बालसंगोपन योजनेत मदत वाढवू असे सांगितले.त्यानुसार बजेटमध्ये ती रक्कम ११२५ वरून २२५०करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सरकार पडले व शासन आदेश निघू शकला नाही. नव्या सरकारने सुरुवातीला या महिलांना वाढ देण्यास नकार दिला. सध्याच्या नव्या सरकारने बजेटमध्ये दिलेली वाढ द्यावी म्हणून सतत पाठपुरावा केला,निवेदने दिली. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही विशेष प्रयत्न केले.बैठक घेतली. एकल समितीचे कार्यकर्ते मिलिंदकुमार साळवे व अशोक कुटे हे त्यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते.मिलिंदकुमार साळवे यांनी उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनाही निवेदन दिले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही वाढ थांबवली म्हणून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.अनेक मंत्री,आमदारांना निवेदन दिले.त्याचा परिणाम म्हणून ५४ आमदारांनी विधिमंडळात यावर प्रश्न विचारले.आशिष शेलार यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्याला प्रतिसाद देत महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही वाढ देण्याची घोषणा केली.त्याप्रमाणे कॅबिनेटसमोर विषय आणला व आज त्याचा शासनआदेश प्रसिद्ध झाला आहे.
राज्यातील जवळपास ५५,००० बालकांना या रकमेचा लाभ त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार आहे. त्यात कोरोनात एकल झालेल्या जास्तीत जास्त महिलांच्या मुलांचा समावेश व्हावा म्हणून कोरोना एकल महिला समितीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यानी लक्ष घालून या महिलांच्या मुलांचे फॉर्म भरून घेतले आहेत.
१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या एकल पालकांच्या दोन मुलांना प्रत्येकी २२५० दर महिन्याला या योजनेत दिले जातात.
कोरोना एकल महिला समितीच्या या प्रयत्नामुळे आज वयाच्या १८ वर्षापर्यंत या मुलांना ही मदत मिळणार आहे.