विरोधकांचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा – माजी आमदार चंद्रशेखर घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भावनात्मक राजकारण करून जातीय वादावर मते मिळवायची व त्यातून राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांना यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील मैदानात पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा, वेळ आल्यावर घुले घराण्याची राजकीय ताकद दाखवून देऊ असे आक्रमक मत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना मांडले.
शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संवाद मेळाव्यात मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठी गर्दी केली. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा बहुमत असतानाही पराभव झाला. हा पराभव सामान्य कार्यकर्ता ते नेता आशा सर्वांच्या जिव्हारी लागला. हा पराभव ज्यांच्यामुळे झाला त्यांची पक्षातून हाकलपट्टी करा, अशी मागणी घुले कुटुंबीयांवर श्रद्धा असणाऱ्यां सर्वांच प्रामाणिक कार्यकर्त्यांनी लावून धरल्यामुळे या विषयावर सविस्तर विचारमंथन करण्यासाठी अवघ्या दोनच दिवसात नियोजन करून शेवगाव येथे संवाद मेळावाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे नेते अँड प्रताप काका ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष कैलास नेमाने, पाथर्डी राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बाळासाहेब ताठे, संजय फडके, मन्सूर फारुकी, नंदकुमार मुंढे, अशोक जमधडे, दीपक बटुळे, ताहेर पटेल, दगडू बर्गे, मयूर वैद्य यांनी आपले विचार मांडले.यावेळी विचारमंचावर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, अरुण पाटील लांडे, बाळासाहेब जगताप, रामनाथ राजापुरे, रणजीत घुगे, राजेंद्र दौंड, गणेश गव्हाणे, राजेंद्र आढाव, कमलेश लांडगे, शंकरराव नारळकर, बंडू बोरुडे, मिलिंद गायकवाड यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले. तर आभार भाऊराव भोंगळे यांनी मानले.
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडीत बहुमत असतानाही पराभवाला सामोरे जावे लागले. याचे दुःख शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातील सामान्य माणसाला आहे.घड्याळातील लहान मोठ्या काट्याला वाटतं आम्हीच घड्याळ आहोत. आम्हीच घड्याळ चालवतो. पण ध्यानात असू द्या आम्ही सर्वजण त्या घड्याळाच्या बॅटऱ्या आहोत आम्ही थांबलो तर काय ?याचा विचार करा,परंतु आम्ही घड्याळापासून केव्हाही बाजूला जाणार नाही. कारण लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचा राजकीय वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही राजकारणा इतकेच समाजसेवेला महत्त्व देतो. असे परखड मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी मांडले.आज पासून शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाच्या प्रत्येक गावात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपण जाणार असल्याचे जाहीर करून याच ठिकाणी नारळ फोडून या संघर्ष यात्राची सुरुवात करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.