बोधेगाव व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सौ. हर्षदा काकडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या भाग्यविधात्या सौ. हर्षदाताई काकडे यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बालविकास तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जनशक्ती विकास आघाडी व बोधेगाव ग्रामस्थांच्या वतीने सौ.काकडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवार दि.१५ रोजी सायंकाळी ७ वा. हनुमान मंदिर बोधेगाव येथे केले असल्याची माहिती जनशक्ती युवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष माणिक गर्जे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
यावेळी बोलतांना माणिक गर्जे म्हणाले की, सौ. हर्षदाताई काकडे या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. शेतकरी, महिला, गोरगरीब जनता, व्यापाऱ्यांना कष्टकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्यापक प्रमाणात लढा देत आल्या आहेत. म्हणूनच तालुक्यातील जनता त्यांच्याकडे भाग्यविधाता म्हणून पाहत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यामधील सर्व क्षेत्रातील महिलांना एका व्यासपीठावर आणून त्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजून घेणे व त्या सोडविण्याचे काम त्यांनी केले. राजकारण व समाजकारणाचा मेळ घालून ताईंनी गेली २०-२५ वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर तालुक्यात उभा केला आहे. एखाद्या आमदारालाही लाजवेल असे ताई यांचे काम आहे म्हणूनच अशा रणरागिनीस महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविले आहे. हा गौरव म्हणजे सौ.काकडे ताई यांचा नसून आपल्या सर्वांचा आहे. त्याबद्दल सौ.काकडे ताई यांचा भव्य नागरी सत्कार सोहळाचे आयोजन बुधवार दि.१५ रोजी सायंकाळी ७ वा. हनुमान मंदिर परिसर बोधेगाव येथे करण्यात आले असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी जनशक्ती युवा विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष माणिक गर्जे यांनी केले आहे.