इतर

पारनेरमध्ये थरराक घटना पारनेर महाविद्यालयात कोयता तलवारीने तरुणावर हल्ला


दत्ता ठुबे/पारनेर :-


जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या पारनेर शहरातील पारनेर महाविद्यालयाच्या आवारात साहील औटी रा. सोबलेवाडी, पारनेर या गुंडप्रवृत्तीच्या तरुणासह त्याच्या समर्थकांनी राडा घातला. खडकवाडी येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या शुभम आग्रे या तरुणावर साहील व त्याच्या गुंडप्रवृत्तीच्या सहकाऱ्यांनी कोयता, कत्तीसह तलवारीने महाविद्यालयाच्या आवारातच हल्ला केला. साहिल औटी त्याच्या दहा- बारा मित्रांसह महाविद्यालयात आला आणि त्याने शुभम आग्रे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. सकाळी महाविद्यालयातील वर्ग भरण्याच्या दरम्यानच हा सारा प्रकार घडल्याने महाविद्यालयात दहशत आणि भितीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी – विद्यार्थीनींनी मोठा आरडाओरड जिवाच्या अतांकाने तिथून पळ काढला. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात रक्त पडले!

दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत शुभम आग्रे हा पडल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील आग्रे याला नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतरच घटनेचे कारण समोर येईल असे समीर बारवकर यांनी सांगितले. दरम्यान, आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक होईल असा विश्वास बारवकर यांनी व्यक्त केला.
पारनेर शहरात दहशतीचे वातावरण!
महाविद्यालयात झालेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून काहींनी यावर बोलण्याचे देखील टाळले. पारनेर शहरात सदर घटनेबाबत आणि साहील औटी याच्या दहशतीबाबत दबक्या आवाजात चर्चा झडत होती. बाजारपेठेसह शहरात यामुळे दिवसभर दहशतीचे वातावरण दिसून येत होते.
साहिल औटीची पारनेरमध्ये दहशत!
साहिल औटी हा सोबलेवाडीचा रहिवाशी आहे.त्याचा महाविद्यालयाशी संबंध नसल्याचे सांगितले जाते. तो येथे शिक्षण देखील घेत नव्हता. मात्र, तरीही तो दिवसातून अनेकदा महाविद्यालयाच्या परिसरात दिसायचा. तरुणींची छेड काढणे आणि त्यांचा पाठलाग करण्याचा त्याने अनकेदा प्रयत्न केल्याची चर्चा आता झडत आहे. पारनेरमध्ये दहशत निर्माण करताना त्याने आपली टपोरीछाप ओळख निर्माण केली. त्यातूनच त्याने पारनेर महाविद्यालयात थेट टोळक्यासह जात तलवार, कत्ती अन्‌‍ कोयत्याचा वापर करत शुभम आग्रे या तरुणावर वार केल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात झाली.
पारनेर पोलिसांची समयसुचकता!
महाविद्यालयाच्या परिसरात गुंड प्रवृत्तीची काही मुले आली असून त्यांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने क्षणाचाही विलंब न लावता सहकाऱ्यांसह महाविद्यालयाकडे प्रस्थान केले. मात्र, पोलिस पोहोचण्याआधीच गुंड साहिल औटी व त्याच्या सहकाऱ्यांनी पळ काढला होता.
कोणालाही सोडणार नाही; बारवकर
पारनेर महाविद्यालयातील घटनेची माहिती मिळताच आम्ही दाखल झालो. मात्र, आरोपी पळून गेले होते. साहील औटी याचे पोलिस रेकॉर्ड आम्ही तपासत आहोत. त्याच्यासह त्याच्या सोबत असणाऱ्या तरुणांची नावे आम्हाला मिळाली आहेत. त्यांचा शोध लावला जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केलेी जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. साहिलसह त्याला पाठबळ देणाऱ्यांचाही बंदोबस्त पोलिस करतील. कोणालाही सोडणार नाही अशी प्रतिक्रीया पारनेर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.
जखमी आग्रेची प्रकृती चिंताजनक!
महाविद्यालय आवारात तीक्ष्ण हत्याराने वार झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शुभम आग्रे (खडकवाडी, पारनेर) या तरुणाला नगर शहरातील सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृत्ती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे हॉस्पिटलच्या सुत्रांनी सांगितले.
हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात!
शुभम आग्रे या तरुणावर साहील औटी व त्याच्या सहकाऱ्यांनी वार का केले, त्याचे कारण काय याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक चौकशीत कोणतीही ठोस माहिती समोर येत नसली तरी मुलीचे प्रकरण यात असावे या अंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आग्रे हा शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या जबाबातूनच हल्ल्याचे कारण समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button