जनतेचा कळवळा मग कामांना स्थगिती का देता ?

आ. नीलेश लंके यांचे २७ मार्चपासून उपोषण
दत्ता ठुबे/पारनेर : प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच मुख्यमंंत्री ग्रामसडक योजनेतून पारनेर-नगर मतदारसंघासाठी मंजुर झालेल्या ८४ कोटी २५ लाख रूपयांच्या निधीशी आ. नीलेश लंके यांचा संबंध नसल्याचा दावा भाजपाच्या वतीने सकाळी पत्रकार परिषदेत करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येऊन बजेटसाठी मंत्रालयात कार्यासन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेली बजेट प्लेटची प्रत तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर कामांचे कार्यारंभ आदेशच पत्रकार परिषदेत सादर करीत भाजपाच्या दाव्यातील हवाच काढून घेण्यात आली.
बजेट प्लेटची प्रत पत्रकार परिषदेत सादर करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी सुजित झावरे यांना बजेट प्लेट कळते का असा सवाल केला. तरटे यांनी जिल्हयाची बजेट प्लेट पत्रकार परिषदेत सादर करीत कोणत्या आमदाराने कोणत्या कामाची शिफारस केली आहे व ते मंजुर झाले आहे ते आ. नीलेश लंके यांच्या नावाच्या पुराव्यासह सादर केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आ. नीलेश लंके यांना २५ किलोमिटरची कामे मिळाली तर खासदार सुजय विखे यांनाही २५ किलोमिटरची कामे मिळाल्याचेही त्यांनी दाखवून दिले. पत्रकार परीषदेस बाबाजी तरटे, सुदाम पवार, अर्जुन भालेकर, विजय औटी, सुवर्णा धाडगे, ठकाराम लंके, रा. या. औटी, भाऊसाहेब भोगाडे आदी उपस्थित होते.
गाजरं दाखवून खोटी आश्वासने
आ. नीलेश लंके यांचे विरोध जनतेला गाजरं दाखवून खोटी अश्वासने देत आहेत.२४ तास ३६५ दिवस सामान्य जनतेसाठी धडपड करणाऱ्या आ. लंके यांना खोट भासविण्याचे काम ही मंडळी करीत असून त्यांच्या या खोटेपणाचे आजच्या पत्रकार परिषदेमुळे दुध का दुध पाणी का पाणी झाले आहे.
अर्जुन भालेकर
जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
बजेट राज्याचं
आणि कौतुक खासदाराचं !
भाजपाच्या वतीने घेण्यात आलेली पत्रकार परिषद ही राज्याच्या बजेटवर होती की केंद्राच्या बजेटवर असा सवाल करीत बाबाजी तरटे म्हणाले, आ. नीलेश लंके यांच्या मंंजुर कामांची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर यांना पोटशुळ उठला. आ. नीलेश लंके यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला. बजेट राज्याचं व कौतुक खासदाराचं असा टोलाही तरटे यांनी लगावला.
जनतेचा कळवळा मग स्थगिती का देता ?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. नीलेश लंके यांनी मंजुर करून घेतलेल्या १०२ कोटी रूपयांच्या कामांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्थगिती दिली आहे. नामदार, खासदारांना खरोखर जनतेचा कळवळा असता तर त्यांनी या कामांना स्थगिती दिलीच नसती असेही तरटे यांनी यावेळी सांगितले.
त्या पत्रांची सत्यता तपासा
भाजपाने पत्रकार परिषदेत सादर केलेली मंत्र्यांच्या पत्रावरच तरटे यांनी आक्षेप घेतला आहे. अण्णा हजारे यांची एक शिफारस आम्हीच घेतली व पाठपुरावा करून ते काम मंजुर केले. त्याबाबतचे पत्र १३ तारखेलाच हजारे यांना प्राप्त झाले. उर्वरीत पत्रांवर १६ तारीख असून त्याच्या सत्यतेवर तरटे यांनी संशय व्यक्त करीत त्याची सत्यता तपासली पाहिजे अशी मागणी केली.
स्वतःच्या लेकरालाच लेकरू म्हणा
स्वतःला महान समजणारे पुढारी पत्रकार परिषदेत खोटी, चुकीची माहीती देऊन जनतेची फसवणूक करू पाहत होते. स्वतःच्या लेकराला लेकरू म्हणा, दुसऱ्याच्या लेकराला नको. तुम्ही विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य आहात का ? सामान्य घरातील तरूण आमदार झाला हेच त्यांना पचत नसून हे प्रस्थापित पत्रकार परिषद घेउन दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत.
सुवर्णा धाडगे
राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष
पालकमंत्र्यांना तालुकाबंदी करू !
कोरोना काळात आ. नीलेश लंके हे रूग्णांची सेवा करीत होते तर तुम्ही रेमडीसिविरचा मेवा खात होते. तुमचे जनतेप्रती असलेेले प्रेम बेगडी आहे. खरे प्रेम दाखवा. खरे काम दाखवा. शेतकरी प्रश्नावर ब्र शब्दही काढला नाही. गुरूवारी तालुक्यात वादळ झाले. त्याच्या नुकसानीवर का बोलले नाहीत असा सवाल सुवर्णा धाडगे यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांना तालुका बंदी करू असा इशारा धाडगे यांनी दिला.
पालकमंत्र्यांचा संबंधच काय ?
जल जीवन मिशन योजनेचा आराखडा महाविकास आघाडीच्या काळात मंजुर झाला. पालकमंत्र्यांची २४ सप्टेंबर २०२२ रोजी निवड झाली असे असताना जल जीवन मिशन योजनेच्या मंजुरीशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा संबंधच काय असा सवाल सुदाम पवार यांनी केला.
▪️
आ. लंके यांचे उपोषण
मे २०२२ मध्ये बंधाऱ्यांच्या ३० कामांना प्रशासकिय मान्यता मिळाल्यानंतर तांत्रीक मान्यताही देण्यात आली. निविदा प्रक्रिया प्रगतीत असताना शासन स्तरावरून या कामांना स्थगिती देण्यात आली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थगिती उठविण्यात आल्यानंतरही या कामांबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आ. नीलेश लंके हे दि. २७ मार्च पासून पुणे येथील जलसंधारण विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. तसे पत्रही त्यांनी अप्पर आयुक्तांना दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चार वर्षे पारनेर दिसले नाही का ?
आमदार नीलेश लंके यांची आम्ही शंभर कामे दाखवितो तुम्ही जिल्हा पुढाऱ्याची पाच कामे दाखवा असे आव्हान देत सुदाम पवार यांनी खा. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. चार वर्षे तुम्हाला पारनेर दिसले नाही का असा सवाल करून पवार म्हणाले, तुम्हाला पुढे काही दिसू लागले म्हणून तुमच्या पारनेरच्या वाऱ्या वाढल्या आहेत. आमच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे.
हेलीकॉप्टर पाहणीची भरपाई कधी ?
तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हेलीकॉप्टर दौरा करून पाहणी केली. एक महिन्यात मदत देतो असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. प्रत्यक्षात मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या हाती छदामही पडला नाही. हेलीकॉप्टर पाहणीची भरपाई कधी मिळणार ?
भाऊसाहेब भोगाडे
आ. नीलेश लंके समर्थक