किसान युनियन पतसंस्थेस १ कोटी ६१ लाखांचा नफा ! – श्री.चंद्रकांत चेडे

दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात पतसंस्थेची पंढरी समजली जाणारा तालुका म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो.शेतकरी युवा उद्योजक व सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्थर उंचविण्यासाठी शेतकरी तसेच युवा उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या किसान युनियन पतसंस्थेस सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ कोटी ६१ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहीती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी दिली.
चेडे यांनी सांगितले की, संस्थेकडे ३५ कोटींच्या ठेवी असून ६ कोटी रूपये गुंतवणूक करण्यात आली आहे. संस्थेची पारनेर शहरात २ कोटी ५० लाख रूपये बाजार मुल्य असलेली स्वमालकीची इमारत असून सभासदांना अत्याधुनिक सुविधा देण्यात येतात.
राष्ट्रीयकृत तसेच इतर सहकारी बँका शेतकरी तसेच युवा उद्योजकांना कर्ज देण्यास कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी तसेच युवा उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी किसान युनियन पतसंस्थेची स्थापना केली.दिलेल्या कर्जाची नियमित कर्जफेड व्हावी याकडे कटाक्षाने लक्ष दिले गेल्याने संस्थेची उलाढाल अल्पावधीत वाढली.परीणामी ठेवीदारांचा विश्वासवृध्दींगत होउन त्यांचा ओघही मोठया प्रमाणात वाढला.
ठेवीदारांकडून घेण्यात आलेल्या ठेवींचे शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय तसेच युवा उद्योजकांसाठी व्यवसाय,वाहनांसाठी कर्जवितरण करण्यात येते.आतापर्यंत कर्ज दिलेल्या अनेक तरूणांनी आपल्या व्यवसाया प्रगती साधली असून किसान युनियन पतसंस्थेने आर्थिक पाठबळ दिल्याने आमच्या जीवनात समृध्दी आल्याच्या प्रतिक्रीया अनेक उद्योजक देतात.
किसान युनियन पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केवळ बँकींगचा व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकीतून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेउन आपले योगदान दिले आहे. त्याची दखल अनेक मान्यवरांनी घेऊन संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक देखील केले आहे.